५०० कोटींनी फसवणूक

By admin | Published: July 29, 2014 12:55 AM2014-07-29T00:55:39+5:302014-07-29T00:55:39+5:30

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शिवाजीनगर येथील वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टने नागपूरसह देशातील अन्य शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची ५०० कोटींहून अधिक रकमेने फसवणूक

500 crores fraud | ५०० कोटींनी फसवणूक

५०० कोटींनी फसवणूक

Next

न्यायालय : वासनकरसह तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शिवाजीनगर येथील वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टने नागपूरसह देशातील अन्य शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची ५०० कोटींहून अधिक रकमेने फसवणूक केल्याची शक्यता सरकार पक्षाने सोमवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयात व्यक्त केली. या प्रकरणी न्यायालयाने प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह तिन्ही आरोपींना २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अन्य आरोपींमध्ये विनय जयदेव वासनकर अभिजित जयंत चौधरी यांचा समावेश असून प्रशांत वासनकरसह हे सर्व आरोपी वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टचे संचालक आहेत. या प्रकरणातील मुख्य फिर्यादी विवेक अशोक पाठक रा. लक्ष्मीनगर यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात एकूण संचालकांसह ९ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे हा तपास सोपविण्यात आला होता. रविवारी प्रशांत वासनकर याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.
आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात या तिघांनाही न्यायालयात हजर करून १४ दिवसपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली.
३६०० गुंतवणूकदार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जप्त केलेल्या नोंदणी अर्जावरून वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे नोंदणीकृत गुंतवणूकदार १८८० आहेत. नवी मुंबईच्या आय.एस.ई. सेक्युरिटीज अ‍ॅण्ड सर्व्हिसेसकडून पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कंपनीकडे सुमारे २६८१ गुंतवणूकदारांचे डी मॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट आहेत. मुंबईच्याच ए. सी. चोक्सी शेअर ब्रोकर कंपनीकडे वासनकरच्या सरला सेक्युरिटिजमार्फत सुमारे १४०० गुंतवणूकदारांचे डी मॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट आहेत. वासनकर कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट नीतेश दावडा याने आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या योजनेत एकूण ३६०० गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याची माहिती दिल्याचे या सूत्राकडून कळते.
अन् ‘उल्लू बनाविंग’
गुंतवणूकदारांच्या ठेवी स्वीकारताना त्यांना वासनकर कंपनीकडून पावत्या दिल्या जात होत्या. वासनकर इन्व्हेस्टमेंटच्या नावे ठेवीच्या संबंधाने प्रॉमिसरी नोट दिल्या जात होत्या. खुद्द प्रशांत वासनकर याने इंडियन ओव्हरसिज बँकेच्या रामनगर शाखेतील स्वत:च्या खात्याचे गुंतवणूकदारांना परताव्याचे धनादेश दिले होते.
प्रशांत वासनकर याची वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी ही सब-ब्रोकर कंपनी होती. या कंपनीने काही रकमा चेकद्वारे आणि मोठ्या रकमा रोखीने स्वीकारल्या. गुंतवणूकदारांनी चेकद्वारे दिलेल्या रकमा आय. एस. ई. सेक्युरिटिज अ‍ॅण्ड सर्व्हिसेस या नावाने स्वीकारल्या होत्या. गुंतवणूकदारांच्याच ट्रेडिंग अकाऊंटमध्ये ट्रेड करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून आममुख्त्यारपत्र घेतले होते. त्यानंतर ‘एफ अ‍ॅण्ड ओ’ सेगमेंटमध्ये ट्रेड करून गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग खात्यातील रकमा संपविल्या होत्या. कंपनीने विविध आकर्षक योजनेंतर्गत ४० ते १५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून भारी रोख रकमा स्वीकारल्या होत्या.

Web Title: 500 crores fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.