ऑनलाइन लोकमत/मयूर देवकर
औरंगाबाद, दि. 19 - बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार पर्यटकांचा समावेश असून औरंगाबादचे ३२ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मंगेश कपोते आणि श्रीपाद जोशी यांनी दूरध्वनीद्वारे लोकमतला दिली.
बद्रीनाथ ते जोशीमठ मार्गावर विष्णूप्रयाग हे गाव आहे असून मार्ग बंद झाल्यामुळे दोन्हीबाजूला हजारो वाहने जागेवर थांबलेली आहेत. प्रत्यक्षदर्शी मंगेश कपोते यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता रस्त्यावर डोंगरावरून छोटे-छोटे दगड पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आम्ही गाडी थांबवली. आमच्या मागे असणारी गाडी समोर गेली. तिला दगडांचा मारा बसला मात्र वेग वाढवून ते समोर निघून गेले. पाहतापाहता संपूर्ण डोंगरच आमच्या डोळ्यासमोर खाली कोसळला आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती ओळखून मग आम्ही गाडी वळवून सुरक्षित स्थळी आलो.

संकटकाळी लयलूट

विष्णूप्रयागच्या आसपास असणारे गोविंदघाट आणि पांडूकेशर गावांतील हॉटेल्समध्ये थांबण्याशिवाय पर्यटकांकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र अशा संकटसमयी मदत करायची सोडून हॉटेल मालकांनी आर्थिक कमाई करण्याचा स्वार्थ आधी पाहिला. सामान्यत: ७०० रुपये भाडे असणाऱ्या रुमचे हॉटेल मालकांनी असहाय्य पर्यटकांकडून ७ ते ८ हजार रुपये वसूल केले. त्याचबरोबर जेवणाचे दरही वाढविण्यात आले. १५ हजार पर्यटकांची व्यवस्था आसपासच्या गावात होणे शक्य नाही. म्हणून जो तो आयती चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीसांनी गावातील एका गुरुद्वारास विनंती करून ३००-४०० पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली. स्थानिकांच्या असंवेदनशीलतेमुळे हजारो लोकांनी रस्त्यावरच आश्रय घेतला. रात्री पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हालापेष्टा आणखी वाढणार असे दिसतेय, असे कपोते म्हणाले. सुरक्षित स्थळांची माहिती व सूचना पोलीस देत आहेत.

सर्व नियोजनच फिसकटले
दरड कोसळल्याने चार धाम यात्रा करण्यास निघालेल्या अनेक यात्रेकरूंचे सगळे नियोजनच फिसकटले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी वाहतूक सुरू होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाचे रेल्वे आणि विमान तिकिट बुक केलेल्या यात्रेकरूंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. ऐनवेळी तिकिट व प्रवासाच्या खर्चाचा अधिक भुर्दंड सोसावा लागणार. अडक लेल्या पर्यटकांमध्ये अनेक लहान मुले आहेत. वातावरण बिघडले किंवा रस्ता लवकर सुरू झाला नाही तर काय अशी चिंता सर्वांना सतावत आहे.

सुदैवाने सर्व सुखरूप
उत्तराखंडच्या डोंगर भागातील या गावात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमजोर असून संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. महत्प्रयासाने मोबाईलवर कॉल लागत आहे. असे असले तरी औरंगाबादचे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे माहिती कपोती यांनी कळविली. बातमी लिहिते वेळेपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये श्रीपाद जोशी, पी. एन. देशमुख, विकास मोहरीर, तुकाराम देवकर, प्रकाश पैठणकर यांचा समावेश आहे.