२२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:49 AM2018-06-03T01:49:37+5:302018-06-03T01:49:37+5:30

जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदलल्याच्या संशयातून आधी आई-वडिलांनी तिला नाकारले. त्यानंतर डीएनए चाचणीत ती तान्हुली त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले खरे पण ‘ती’च्या मागचा भोग काही संपत नाही.

 22 days old Tanhuli again became orphans! | २२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ!

२२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ!

Next

बीड : जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदलल्याच्या संशयातून आधी आई-वडिलांनी तिला नाकारले. त्यानंतर डीएनए चाचणीत ती तान्हुली त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले खरे पण ‘ती’च्या मागचा भोग काही संपत नाही. रुग्णालयातील रजिस्टरवर नोंद केल्याप्रमाणे आम्हाला मुलगाच झाला होता, असे सांगत आई-वडिलांनी सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविल्याने शनिवारी तिची रवानगी औरंगाबादमधील शिशुगृहात करण्यात आली.
छाया राजू थिटे (रा. भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. कुप्पा ता.वडवणी, जि. बीड) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता चिमुकलीला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात चुकून मुलगा अशी केली. वजन कमी असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलविण्याचा
सल्ला दिला.
त्यानुसार बाळाला खासगी रूग्णालयात दाखल केले. दहा दिवस उपचारानंतर २१ मे रोजी बाळाला आईच्या स्वाधीन केले. परंतु, मुलगा नसून ती मुलगी असल्याचे समजताच आईने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी बाळाचे व थिटे दाम्पत्याचे रक्त घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले.
त्याचा अहवाल प्राप्त होताच
ते बाळ थिटे यांचेच असल्याचे
स्पष्ट झाले.
त्यानंतर शुक्रवारी बाळाला थिटे दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. रात्रभर त्याचा सांभाळ केल्यानंतर शनिवारी त्यांनी सांभाळण्यास आपण असमर्थ असल्याचा जबाब बालकल्याण समितीसमोर दिला. समितीचे अध्यक्ष डॉ.अभय वणवे यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला मात्र ते नकारावर ठाम राहिले.

एका चुकीमुळे ‘ती’चे हाल
जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी ऐवजी मुलगा असे लिहिण्यात आले. त्यानंतर थिटे दाम्पत्याच्या हाती मुलगी सोपविली गेली. आपल्याला मुलगा झाला होता, मुलगी नाही, अशा समजुतीने त्यांनी बाळास स्वीकारण्यास नकार दिला. डीएनए अहवालानंतर हे बाळ आपलेच असल्याचे उघड होऊनही त्यांनी ‘ती’ला नाकारले. दोषी डॉक्टर व परिचारिकांमुळेच या चिमुकलीच्या नशिबी अनाथाचे जीवन आले.

थिटे यांना पहिलीही मुलगीच : छाया राजू थिटे यांना अडीच वर्षांची एक मुलगी आहे. मजुरीसाठी हे दाम्पत्य हिंगोलीहून बीडला आलेले आहे. आधीही मुलगीच आणि आताही मुलगीच झाल्याने त्यांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. आपला डीएनएवर विश्वास नाही. आम्हाला मुलगाच झाला होता, यावर थिटे दाम्पत्य ठाम आहे.

Web Title:  22 days old Tanhuli again became orphans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.