मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकºयांना फायदा होईल, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
कृषी मूल्य आयोगाच्या स्थापनेमुळे राज्यातील शेतमालाच्या संदर्भात केंद्राशी समन्वय साधणे शक्य झाल्याचे सांगून राज्यमंत्री खोत म्हणाले की, धान्यावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गहू आयातीवर २० टक्के आयात शुल्क करण्यात आले. यापूर्वी ते १० टक्के होते, तर पिवळ्या मटारवरील आयात शुल्क ५० टक्के केले आहे. यापूर्वी मटारवर शून्य टक्के आयात शुल्क होते.