मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:14 AM2024-02-12T06:14:36+5:302024-02-12T06:16:02+5:30

कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंबपद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे

16th Feb Special Session for Maratha Reservation?; The final seal will be given in the cabinet meeting | मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

मुंबई : Maratha Reservation Update ( Marathi Newsमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर  १६ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे.  त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा महामोर्चाही काढला होता. त्यानंतर कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंबपद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशन घेण्याबाबत निर्णय घेत आहे. 

राज्यपालांचे अभिभाषण होणार
दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होते. नियम असा आहे की, वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण व्हावे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षाच्या सुरुवातीला होणारे पहिले अधिवेशन असते. मात्र, आता मराठा आरक्षणासंदर्भात आधीच अधिवेशन होणार असल्यामुळे या अधिवेशनातच राज्यपालांचे अभिभाषण होईल.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडणार 
१६ फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाबाबतचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांचा तपासणीसाठी नकार

सरकारने दिलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जरांगे-पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला आल्यापावली परतावे लागले. जरांगे-पाटील यांचे हे चौथे उपोषण असून, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांसह विविध संघटना अंतरवाली सराटीत येत आहेत. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या भागातील  ४० पीएच.डी चे विद्यार्थी आले असून, मागच्या अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्याने सारथीचे विद्यार्थीही जरांगे-पाटील यांच्यासोबत अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सारथीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 

Web Title: 16th Feb Special Session for Maratha Reservation?; The final seal will be given in the cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.