shivsena protest against bjp at Latur | राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करत शिवसेनेकडून लातूरच्या पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव

निलंगा (लातूर) : राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करत शिवसेनेचे अभय साळुंके यांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला.  पालकमंत्री असा फलक चिकटवलेली खुर्चीचा गुरुवारी (21 डिसेंबर) सकाळी लिलाव सुरु केला होता. यावेळी सदर खुर्चीची सर्वाधिक 45 हजार रुपये इतकी बोली लावून छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी खुर्ची विकत घेतली.

शेतकऱ्यांना सरसकट, संपूर्ण कर्जमाफी करा, शेतीमालाला हमीभाव द्या आदी मागण्या करत हे आंदोलन पुकारले होते. गेली काही दिवस पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्या मतदार संघात शेतकरी जनजागृती केली जात होती. लिलावाच्या बोलीबाबत अनेक शेतकरी, पक्ष कार्यकर्ते, संघटना पदाधिकाऱ्यांनी पावत्या फाडल्या होत्या. सदर पावती व लिलावातून जमणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी खर्च केली जाणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

ही स्टंटबाजी - भाजपाचा पलटवार
शिवसेना सत्तेत सहभागी आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला नाकर्ते ठरवत आहात. हा दुटप्पीपणा जनता ओळखते. हे निव्वळ राजकारण आहे. निलंग्यात केलेली ही स्टन्टबाजी सर्वांनाच समजते, असा टोला भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने लगावला.