प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

By संदीप शिंदे | Published: April 21, 2023 06:35 PM2023-04-21T18:35:55+5:302023-04-21T18:36:12+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला.

Latur district honored by Prime Minister Narendra Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ची अंमलबजावणी तसेच आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि २० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, सचिव डॉ. पी.के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा, सचिव श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी लातूरसह देशभरातील १५ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रधानमंत्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, आरोग्यवर्धिनी सल्लागार सोनाली नागठाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. त्यात आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवांचा ०समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराने उत्साह, समर्पण वाढण्यास मदत - जिल्हाधिकारी
लातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने आरोग्य विभागाचा चमू आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढला असून, यापुढे सर्वजण अधिक समर्पण भावनेने काम करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.

 

Web Title: Latur district honored by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.