महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत

By आशपाक पठाण | Published: March 3, 2024 07:35 PM2024-03-03T19:35:57+5:302024-03-03T19:36:13+5:30

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते.

Fire at Mahavitran's power transformer Loss of lakhs of rupees, power supply cut in the area | महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत

महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत

अहमदपूर: येथील महावितरण उपविभागातील एक पॉवर ट्रान्सफार्मरला भीषण आग लागल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी ३ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून ग्रामीण भागातील काही गावांची वीज गुल झाली आहे.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. यापैकीच एका अधिकाऱ्याने नगरपालिका अग्नीशमन दलास पाचारण केले. अग्नीशमन दलातील कर्मचारी सोनकांबळे कैलास, लाळे अजित, जाधव प्रकाश, गायकवाड प्रशांत यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत खाक झालेला पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्त होण्यासाठी अयोग्य असल्याने नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात किती वेळ लागेल याची चिंता शहरवासियांना भेडसावत आहे.

आगीमुळे ट्रान्सफार्मरमधील ऑईलचे फवारे उडून महावितरण कार्यालयाच्या परिसरातील गवतासही आग लागल्यामुळे थोडा वेळ परिसरात भितीचे वातावरण होते. आग इतकी भिषण होती की शहरात सर्वत्र काळ्या काळ्या धुराचे लोट पसरल्याने शहरातील घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी भेट देऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

आगीचे कारण अस्पष्ट...

या संदर्भात महावितरणचे उप- कार्यकारी अभियंता दिनकर पिसे म्हणाले, पॉवर ट्रान्सफार्मरला आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पथकाकडून याची तपासणी केल्यावर नेमके कारण स्पष्ट होईल. शहराचा काही भाग वगळता विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल.

Web Title: Fire at Mahavitran's power transformer Loss of lakhs of rupees, power supply cut in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.