सीएम चषक स्पर्धेच्या विजेत्यांचा झाला 'गेम'; बक्षिसाची अर्धी रक्कम देऊन केली बोळवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:41 AM2019-02-18T11:41:52+5:302019-02-18T11:46:04+5:30

रोख बक्षीस वाटणारे संयोजक व खेळाडू-संघात बक्षिसावरून बाचाबाची झाली. जवळपास दोन तास हा खेळ सभागृहात सुरू होता.

CM championship 'winners' got The half of prize money | सीएम चषक स्पर्धेच्या विजेत्यांचा झाला 'गेम'; बक्षिसाची अर्धी रक्कम देऊन केली बोळवण 

सीएम चषक स्पर्धेच्या विजेत्यांचा झाला 'गेम'; बक्षिसाची अर्धी रक्कम देऊन केली बोळवण 

ठळक मुद्देबक्षिसाची रक्कम अर्धवट दिल्याने गोंधळअर्धवट रोख बक्षिसे दिल्याने खेळाडूंत नाराजी 

- महेश पाळणे

लातूर : देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव म्हणून टिमकी मिरविणाऱ्या सीएम चषकातील बक्षिसावरून रविवारी लातुरात गोंधळ झाला. विजेत्या खेळाडूंना व संघाला निम्म्यावरच बक्षीस रक्कम देऊन बोळवण केल्याने प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी सभागृहात बक्षिसावरून वेगळाच ‘खेळ’ रंगला.

३१ आॅक्टोबर ते १२ जानेवारी दरम्यान विविध खेळांच्या सीएम चषकातील तालुका व जिल्हास्तरावरील विधानसभा निहाय स्पर्धा घेण्यात आल्या. यात खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कुस्ती, कबड्डी, कॅरम, धावणे यासह कला स्पर्धांचाही समावेश होता. रविवारी जिल्हास्तरावरील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार होते. यासाठी डीपीडीसीच्या सभागृहात कार्यक्रमही घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते केवळ खेळाडूंना प्रमाणपत्र व चषकाचे अनावरण झाले. रोख बक्षिसे मात्र दिली गेली नाहीत. काही वेळानंतर मान्यवर जाताच बक्षिसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यावेळी विजेत्यांना अर्धवट रोख बक्षिसे दिल्याने असंतोष पसरला.

रोख बक्षीस वाटणारे संयोजक व खेळाडू-संघात बक्षिसावरून बाचाबाची झाली. जवळपास दोन तास हा खेळ सभागृहात सुरू होता. मैदानावर घाम गाळून विजय मिळविणाऱ्या खेळाडूंची मात्र यावेळी गोची झाली. प्रत्येक खेळ प्रकारानुसार रोख रक्कम तालुका व जिल्हास्तरावर देण्यात येत होती. मात्र ती कमी दिल्याने खेळाडूंत नाराजी होती. त्यावरून हा वाद झाला. मैदानी स्पर्धेतील विजेत्या महिला व पुरुष गटांना स्वतंत्र पारितोषिक आयोजकांच्या माहितीपत्रकावर नमूद केले असले तरी एकाच बक्षिसाची रक्कम या दोन्ही गटांना विभागून देण्यात आली. काही खेळात तर पुरुष व महिला बक्षिसांचा उल्लेख नव्हता. त्यावरूनही खडाजंगी झाली. एकंदरित, घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील खेळाडूंत असंतोष पसरला होता. त्यानंतर संयोजकांनी विजेत्या खेळाडूंची नावे व मोबाईल नंबर घेऊन आम्ही तुम्हास लवकरच बक्षिसे देऊ, असे म्हणून यावर पडदा टाकला. 

लातूर तालुक्याचे बक्षीसही अधांतरी... 
तालुकास्तरावर अनेक ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तालुकास्तरावर बक्षिसे देण्यात आली. मात्र लातूर तालुक्यात अद्यापि बक्षीस वितरण झाले नाही. त्यामुळे संयोजकाचा ढिसाळपणा यावरूनही स्पष्ट होतो. याबाबत मुख्य संयोजकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दोन दिवसात बक्षिसे देऊ... 
पुरुष व महिला गटांच्या बक्षिसामुळे बक्षिसे वाटप करणाऱ्या संयोजकांकडून गफलत झाली. मैदानी स्पर्धेसह उर्वरित बक्षिसाची रक्कम दोन दिवसात खेळाडूंना पोहोचते करू. यासाठी आम्ही त्यांचे मोबाईल नंबर व नावे घेतली आहेत, अशी माहिती स्पर्धेचे जिल्हाध्यक्ष अमित रेड्डी यांनी दिली. 

तीन वेळा बदलली तारीख... 
जिल्हास्तरावरील बक्षीस वितरणाच्या तारखा तीन वेळा ठरविण्यात आल्या होत्या. काहीना काही कारणामुळे या बदलण्यात आल्या. रविवारी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठरला. मात्र यात वेगळाच गोंधळ झाल्याने देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणणाऱ्या या स्पर्धेचा मात्र फज्जा उडाला.

राज्य स्पर्धेचाही थांगपत्ता नाही... 
मुंबई येथे नुकत्याच राज्यस्तरीय सीएम चषक स्पर्धा झाल्या. यातील काही खेळ प्रकारांची माहिती जिल्ह्यातील संघाला न दिल्याने ते या स्पर्धेला मुकले, असेही काही खेळाडूंनी सांगितले. 

विजेत्यांचे काय आहे म्हणणे :
तालुकास्तरावरही आम्हाला कमी बक्षीस देण्यात आले. आज जिल्हास्तरावरही बक्षिसाची रक्कम अर्धवटच देण्यात आली. यामुळे खेळाडू कसा पुढे जाईल. 
        -अमर येमले, खेळाडू

कबड्डी खेळातही आमच्या संघाला बक्षिसाची रक्कम कमी देण्यात आली. संयोजकांपुढे आम्ही याबाबत गाºहाणे मांडले. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. 
- वैष्णवी जाधव, कबड्डीपटू. 

माझी मुलगी राष्ट्रीय खेळाडू आहे. ती जिल्हास्तरावर द्वितीय होती. नियमानुसार तिला ५ हजार रुपये बक्षीस मिळाले पाहिजे होते. मात्र आम्हाला २ हजारच बक्षीस दिले. 
-उमाकांत श्रीडोळे, पालक

Web Title: CM championship 'winners' got The half of prize money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर