औराद शहाजानीचा पारा ४१ अंशावर; दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

By संदीप शिंदे | Published: March 29, 2024 04:15 PM2024-03-29T16:15:48+5:302024-03-29T16:17:34+5:30

अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उष्ण-दमट वातावरण तयार होत असून, यामुळे उकाडा वाढत आहे.

Aurad Shahajani's temperature at 41 degrees; no mans on Roads in the afternoon | औराद शहाजानीचा पारा ४१ अंशावर; दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

औराद शहाजानीचा पारा ४१ अंशावर; दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

औराद शहाजानी : मार्च महिन्याच्या मध्यंतरी कमाल ३७ अंशांवर असलेले तापमान आता ४१ अंशावर पोहोचले असून, किमान तापमान २७ अंशांवर पोहोचले असल्याची नोंद औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर झाली आहे. परिणामी, नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत असून, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरामध्ये गेल्या वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे पाण्याची पातळी मार्च महिन्यातच खालावली आहे. तेरणा-मांजरा नदीचे पात्र कोरडे पडले असून, नदीपात्र कोरडी पडली आहेत. एक दोन धरणांमध्ये अल्प पाणी साठा असला तरी तर इतर सर्व उच्चस्तरीय बंधारे, तलाव, साठवण क्षेत्र पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. यातच यावर्षी परतीचा पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला. परिणामी बाष्पीभवन वाढण्याचा दर हा गेल्या दहा वर्षांतील तुलनेमध्ये अधिक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

यावर्षी सातत्याने कमाल व किमान तापमान उच्चांकी पातळीवर राहत आले आहे. एप्रिल महिन्यातील गर्मी ही मार्च महिन्यामध्ये अधिक जाणवू लागली होती. यातच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ३७ अंशांवर असलेले तापमान २९ तारखेला तब्बल चाळिशी पार करत ४१ अंशांवर पोहोचले आहे, तर किमान तापमान २४ वरून २७ अंशांवर पोहोचल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यातच कधी अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उष्ण-दमट वातावरण तयार होत असून, यामुळे उकाडा वाढत आहे. दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य होताना दिसून येत असून, यातच उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, छत्री, पांढरा कपड्याचा वापर वाढला आहे. अंगात थंडाई निर्माण व्हावी म्हणून आइस्क्रीम, ज्यूस, खरबूज, टरबूज खाण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.

औराद हवामान केंद्रावर ४१ अंशांची नाेंद...
औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर २८ मार्चला कमाल ४१ अंश, तर किमान २८ अंश तापमान होते. २७ मार्च रोजी कमाल ३९, किमान २५.५, २६ रोजी कमाल ३८, तर किमान २५ अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले. आगामी काळात तापमानात अशीच वाढ झाली तर उकाडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, उष्ण दमट वातावरणामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकरी देवराव म्हेत्रे यांनी सांगितले.

Web Title: Aurad Shahajani's temperature at 41 degrees; no mans on Roads in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.