नांदेडमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 10:54 AM2018-05-12T10:54:51+5:302018-05-12T11:26:33+5:30

लातूर-नांदेड रस्त्यावर भीषण दुर्घटना घडली आहे. वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

8 dead in an accident at Latur-Nanded road | नांदेडमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

नांदेडमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

नांदेड : लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींवर काळानं घाला घातला आहे. जांबपासून जवळच असलेल्या मुखेड-शिरुर रोडवर आयशर टेम्पो व टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झालेत. कटई मशीनजवळ शनिवारी (12 मे) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मुखेडच्या दिशेनं वऱ्हाडाचं वाहन प्रवास करत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. 

या अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना जळकोट येथे तर वीस जणांना मुखेड येथे हलवण्यात आले.  अपघातातील टेम्पो (क्र. एमएच-३६-ए-३५१९) खरोसा (लातूर) येथील आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक बसल्यामुळे टेम्पो पाठीमागील बाजूस जाऊन  वऱ्हाडी मंडळी खाली फेकली गेली. व त्यांच्यावर अंगावरुन टेम्पो गेला. याच दरम्यान मागील बाजूनं येणाऱ्या कारलादेखील टेम्पोची धडक बसली. सुदैवानं कारमधील नागरिकांना कोणतीही  दुखापत झाली नाही. वऱ्हाडाच्या टेम्पोमध्ये एकूण 54 महिला-पुरुष, बालकं होती. 

औसा तालुक्यातील खरोसा येथील लक्ष्मण कोंडिबा नारंगे या तरुणाचा विवाह सोहळा मुखेड येथे होणार होता. त्यासाठी खरोसा येथून तीन टेम्पो भरुन वऱ्हाड निघाले होते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर मुखेड, जळकोट, बाऱ्हाळी, जांब येथील रुग्णवाहिका तसेच मुखेड व जांब येथील उप-सहाय्यक गणपत गिते व मुखेड येथील पोलीस निरीक्षक संजय चोबे व जळकोट येथील पोलीस निरीक्षक पटेल तसेच गावातील नागरिक सूर्यकांत मोरे, हिप्परगेकर, बाळासाहेब पुंडे, मनोज गौंड आदी मंडळी जखमींना उपचारासाठी मदत करत होते. 

जांबवासीय धावले मदतीला- 
सकाळी 9 वाजता अपघाताची घटना घडल्या घडल्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर राहत असलेल्या श्रीकांत मोरे यांनी दुर्घटनेची माहिती आपल्या मित्रांना कळवली. त्यानंतर सूर्यकांत मोरे, हिप्परगेकर, विष्णू जामकर, पांडूरंग मोरे यांच्यासह अनेक जण अपघातातील जखमींच्या मदतीसाठी धावले. जवळपास 10.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी मुखेड, जळकोट आणि जांब या तीन ठिकाणच्या रुग्णवाहिका दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातातील मयतांची नावे
जखमीवर नांदेड आणि जळकोट येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची नावं

रुख्मीणबाई राजे (वय ७०, रा. निटूर ता. औसा), शमा सत्तार तांबोळी (वय ३८, रा. खरोसा ता. औसा), कस्तुरबाई फुलबांगडीकर (वय ६०, रा. मुरुम ता. उमरगा), अरुणा शेषराव नांदगे (वय ४५, रा. लातूर), बाळू नागनाथ किडमपल्ली (वय ७०, रा. वागदरी), मंदाबाई कुंभार (वय ६०, रा. मुरुम), महानंदाबाई बोडखे (वय ४५,रा. खरोसा ता. औसा),  स्नेहा सुधीर कु-हाडे (वय १०, रा. ममदापूर ), सुमनबाई बाळू कुंभार (वय ६५, रा. वागदरी), टेम्पो चालक तुकाराम बागले (वय ३६, रा. मुरंबी ता. चाकूर)

खरोसा गावावर शोककळा
लग्नासाठी खरोसा येथून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडाचे तिन्ही टेम्पो निघाले होते. ९. ३० वाजेच्या दरम्यान अपघात झाला आहे आणि पुढच्या पंधरा मिनिटांत गावात ही माहिती समजली. यानंतर ग्रामस्थ मिळेल ते वाहन घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले. तेथील परिस्थिती पाहून सर्वच जण सुन्न झाले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: 8 dead in an accident at Latur-Nanded road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.