४२ लाखांची थकबाकी; औसा शहराचा पाणीपुरवठा केला बंद

By संदीप शिंदे | Published: March 30, 2024 04:51 PM2024-03-30T16:51:10+5:302024-03-30T16:51:21+5:30

परिणामी शहरातील नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान व सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

42 lakhs in arrears; Water supply to Ausa city stopped | ४२ लाखांची थकबाकी; औसा शहराचा पाणीपुरवठा केला बंद

४२ लाखांची थकबाकी; औसा शहराचा पाणीपुरवठा केला बंद

औसा : मागील दोन-तीन वर्षांपासून औसा शहराला निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन प्रकल्प माकणी या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. औसा नगरपालिकेकडे पाण्याची ४२ लाख रुपये थकबाकी असल्याने बुधवारपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी शहरातील नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान व सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

शिऊरच्या तावरजा प्रकल्पातून औसा शहराला होणारा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने आ. अभिमन्यू पवार यांनी प्रयत्न करून माकणी धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली व प्रत्यक्षात कार्यान्वित देखील केली. मात्र, पालिका प्रशासनाने पाण्याची बाकी न भरल्याने अखेर माकणी येथील पाणीपुरवठा यंत्रणा बंद करण्याची कारवाई सिंचन विभागाने केली. औसा पालिकेने पाणीपुरवठा थकबाकी पोटी केवळ चार ते साडेचार लाख रुपयांचा भरणा केला असून, निम्मी रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही, असे उपसा सिंचन शाखा माकणीचे अभियंता कृष्णा येणगे यांनी सांगितले. पालिकेला वारंवार सूचना देऊनही बाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत...

थकबाकी न भरल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला ही बाब खरी आहे. थकबाकीपोटी ४ लाख ५० हजार रुपये भरले आहेत. मात्र, निम्मी रक्कम भरण्याचा तगादा केला जात आहे. दोन दिवसांत बाकी भरण्यात येईल. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. नळधारकांनी त्यांच्याकडील पाणीपट्टीची रक्कम भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे.

Web Title: 42 lakhs in arrears; Water supply to Ausa city stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.