‘आमचंही ठरलंय’ यंदा गणेशोत्सव दणक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:04 PM2019-07-08T12:04:55+5:302019-07-08T12:07:47+5:30

आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी गणेशोत्सव दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने यंदाचा गणेशोत्सव झोकात होण्याची शक्यता आहे.

'We have also decided' this year in Ganeshotsav | ‘आमचंही ठरलंय’ यंदा गणेशोत्सव दणक्यात

‘आमचंही ठरलंय’ यंदा गणेशोत्सव दणक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देआगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंडळांची तयारी सुरू नेते मंडळींच्या अंगावर आतापासून शहारे

कोल्हापूर : आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी गणेशोत्सव दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने यंदाचा गणेशोत्सव झोकात होण्याची शक्यता आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे तालीम मंडळांना गणेशोत्सव दिमाखदार स्वरूपात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते मंडळी, उद्योजक, व्यापारी वर्गणी देतात. त्यातून मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टिम कमी प्रमाणात वाजल्या; त्यामुळे २०१८ चा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषणापासून काही प्रमाणात वाचला, तर यंदा विधानसभेची निवडणूक महिना, दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे; त्यामुळे मंडळांचे आश्रयदाते असलेली नेतेमंडळी या मंडळांना अर्थसहाय्य पुरविण्यास उत्सुक आहेत. त्याचाच फायदा घेत अनेक मंडळांनी आतापासूनच गणेशोत्सवाच्या नियोजनास सुरुवात केली आहे.

यात एकवीस, चौदा फुटी गणेशमूर्ती बसविण्याचे नियोजन केले आहे. याच्या जोडीला लेझर लाईट, साऊंड सिस्टिम, विविध प्रकारची वाद्यवृंदे, नृत्य प्रकार सादर करणाऱ्या मुंबई, चेन्नई, हैदराबाद येथील संस्थांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या बजेटचा अंदाज घेण्याचे कामही मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत. मंडळाचे कार्यकर्ते बोलताना ‘भावा घाबरायचं नाय, यंदा दणक्यात गणपती करायचा’ असे एकमेकांना सांगत आहेत; त्यामुळे यंदा आगमन व विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमसह मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती मंडळांकडे पाहण्यास मिळणार आहेत.

पावसातही अनेक मंडळांच्या कार्यालयात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बैठकाही झडू लागल्या आहेत. यात मागील वर्षीचे हिशेब पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच सोबतीला यंदा नावीन्यपूर्ण काय करायचे, याचाही विचार सुरू झाला आहे. विशेषत: काही नेतेमंडळींनी पेठापेठांतील मंडळांशी आतापासूनच संपर्क साधला आहे. तुम्ही आकडा सांगायचा आणि आम्ही तो पूर्ण करायचा, असेही वायदे केल्याची चर्चा आहे; त्यामुळे विधानसभा येत्या दोन महिन्यांत होवो अथवा पुढे कधीपण होवोत, गणेशोत्सव मात्र दणक्यात होणार हे कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे.

काही इच्छुकांची गणेशोत्सवाच्या तोंडावर उमेदवारी जाहीर केली, तर गणेशोत्सवाची देणगी आणि दोन महिन्यांनी होवू घातलेल्या निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर करायचा खर्च असे दोन्ही वेळेला खर्चाचा भार पडला आहे; त्यामुळे अशा छुप्या इच्छुकांच्या अंगावर आतापासूनच शहारे आले आहेत, अशा इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे.

इथेही ‘आमचंही ठरलंय’

शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षांच्या नेहमीच्या नेतेमंडळींबरोबर नवोदितांनाही तिकीट आपल्यालाच मिळेल, अशी आशा आहे; त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे इतकी मंडळे, कार्यकर्ते आहेत, हे दाखविण्यासाठी या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आतापासूनच बरोबरीला घेत आहेत. यात पक्षाच्या हाय कमांडकडे इच्छुक आहे, असे दाखविण्यासाठी या कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. त्याचाच अंदाज घेत या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचा ‘आमचंही ठरलंय’ असे सांगण्यास सुरुवात केली आहे.
 

 

Web Title: 'We have also decided' this year in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.