सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे हवीत : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:34 AM2018-08-17T00:34:48+5:302018-08-17T00:34:53+5:30

Vasant Bhosale should have a platform for social issues | सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे हवीत : वसंत भोसले

सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे हवीत : वसंत भोसले

Next

कुरुंदवाड : बदलत्या काळात सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे संपुष्टात येत आहेत. या व्यासपीठांची जागा आता जातीवर आधारित चळवळी घेत आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होत असून, भविष्यातील जाती-जातींमधील दंगलीच्या धोक्याची ही घंटाच आहे. समाजातील अशा गढूळ वातावरणातही सुरेश शिपूरकर यांचे कार्य व समाजाला दिशा देणारी त्यांची चळवळ दीपस्तंभासारखी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.
येथील साधना मंडळ, राष्ट्र सेवा दल व स्व. सुरेंद्र आलासे परिवार यांच्यावतीने कै. साथी सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांना संपादक भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते. नगराध्यक्ष जयराम पाटील प्रमुख उपस्थित होते.
भोसले म्हणाले, विज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले असले, तरी आजूबाजूचा परिसर, समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनल्या आहेत. पूर्वीची शेती स्वयंपूर्ण होती. मात्र, आता परावलंबी बनली आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. शिक्षणाचे खासगीकरण झाले; मात्र दर्जाहीन शिक्षणामुळे बेकारी वाढत आहे. तरुणांना दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे व्यासपीठ काळाच्या ओघात संपुष्टात येत आहे. राजकीय स्वार्थातून ती जागा जातीय व्यासपीठाने घेतली आहे. कोणत्याही समाजाचे प्रश्न केवळ आरक्षणाने सुटणार नाहीत, तर तरुणांनी स्वत:चे कौशल्य व बुद्धिमत्ता सिद्ध करणारे शिक्षण घेतल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. अशा परिस्थितीतही साधना मंडळाने शिपूरकरांसारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचा गौरव करून त्यांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो, हे कौतुकास्पद आहे.
माजी आमदार शिंदे म्हणाले, शिपूरकरांचे कार्य आदर्शवत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा पुरस्काराची उंची वाढविणारा आहे. त्यांची चळवळ व विचार नव्या पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. सत्काराला उत्तर देताना शिपूरकर म्हणाले, माणसाची उंची वयाने नाही तर बुद्धीने मोजली जाते. माझा सत्कार एका विचारवंत व ज्ञानी संपादकांच्या हस्ते होत असल्याचा मला अभिमान आहे. पुरस्कारातून मिळालेला निधी सामाजिक चळवळ करणाऱ्या संस्थांना देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष स. ग. सुभेदार, जयपाल बलवान, अब्बास पाथरवट, अ. शा. दानवाडे, अ‍ॅड. देवराज मगदूम, भूपाल दिवटे, माणिक नागावे, राजेंद्र आलासे, रवींद्र आलासे, शशिकांत पाटील उपस्थित होते. वैभव उगळे यांनी आभार मानले.

 

Web Title: Vasant Bhosale should have a platform for social issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.