अनपेक्षीत धक्कादायक : कोल्हापूर महानगरपालिका ‘स्थायी’च्या निवडणुकीत ‘भाजप’चा दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:45 PM2018-02-12T14:45:41+5:302018-02-12T15:11:23+5:30

कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सोमवारी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला अनपेक्षीत असा जबरदस्त धक्का दिला. भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेघा आशिष पाटील यांचा दोन मतांनी धक्कादायक पराभव केला.

The unfortunate shock: Kolhapur Municipal Corporation | अनपेक्षीत धक्कादायक : कोल्हापूर महानगरपालिका ‘स्थायी’च्या निवडणुकीत ‘भाजप’चा दे धक्का

अनपेक्षीत धक्कादायक : कोल्हापूर महानगरपालिका ‘स्थायी’च्या निवडणुकीत ‘भाजप’चा दे धक्का

Next
ठळक मुद्देआशिष ढवळे सभापती, मेघा पाटील यांचा पराभवराष्ट्रवादीच्या अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण यांची मते फुटलीभाजपने घोडेबाजाराची सुरवात केल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सोमवारी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला अनपेक्षीत असा जबरदस्त धक्का दिला. भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेघा आशिष पाटील यांचा दोन मतांनी धक्कादायक पराभव केला.

सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली खदखद प्रत्यक्ष मतदानावेळी उफाळून आली आणि त्याची परिणीती अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या बंडखोरीत झाली.

दरम्यान, स्पष्ट बहुमतात असतानाही झालेल्या या पराभवाने सैरभैर झालेल्या कॉँग्रेस - राष्ट्रवादीने भाजपवर घोडेबाजार केल्याचा घणाघाती आरोप केला असून ‘काहीही करा पण भाजपची सत्ता महापालिकेत आणा’ अशा सुचना करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची पूर्तता या निवडणुकीत केली अशी टीकाही केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत तसेच विविध विषय समित्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत जंग जंग पछाडूनही भाजप - ताराराणी आघाडीला सत्तेपर्यंत पोहचता आले नाही. याची सल भाजपला होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे पदाधिकारी निवडणुकीत चमत्काराची भाषा केली होती, पण गेल्या तीन वर्षात त्यांना कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या बहुमताला छेद देता आला नाही. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मात्र हा चमत्कार घडवून आणण्यात यशस्वी झाले.

विशेष म्हणजे भाजप-ताराराणी आघाडीकडून स्थायी समिती सभापती निवडीमागच्या सर्व हालचाली अतिशय गोपनिय ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या आघाडीच्या नगरसेवकांना देखिल याची कुणकुण लागली नव्हती. कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक नेते तर विजयाच्या आणि मिरवणुक काढण्याच्या भ्रमातच होते.

निवडणुक प्रक्रीया सुरु झाल्यानंतर जेंव्हा दहा मिनिटांचा वेळ देण्यात आली, त्यावेळी एकत्र बसलेल्या राष्ट्रवादीच्या अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे एकमेकांशी बोलत होते. निवडणुक अधिकारी तथा पिठासन अधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रथम आशिष मनोहर ढवळे यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या सदस्यांना हात वर करण्यास सांगितले, त्यावेळी भाजप ताराराणी आघडी सदस्यांसह अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनीही हात वर केले. त्यामुळे ढवळे यांना ९ मते पडली. नंतर मेघा आशिष पाटील यांना मतदान करण्याऱ्यांना हात वर करायला सांगण्यात आले तेंव्हा त्यांच्या बाजूने ७ मते पडली. दोन मतानी आशिष ढवळे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

सभागृहात चव्हाण व पिरजादे यांनी विरोधात मतदान केल्याची आणि मेघा पाटील यांचा पराभव झाल्याची माहिती बाहेर येताच कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत सन्नाटा पसरला. तर भाजप - ताराराणी आघाडीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या अनपेक्षित तसेच धक्कादायक निकालामुळे महापालिकेत वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले. पोलिस बंदोबस्तही तात्काळ वाढविण्यात आला.

अनपेक्षीत पराभवाने सत्ताधारी सैरभैर

९ विरुध्द ७ अशा मतांच्या फरकाने सत्ताधारी कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत मेघा पाटील विजय होणार असेच वातावरण होते. परंतु अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी बंडखोरीसह विरोधात मतदान केल्यामुळे भाजपचे आशिष ढवळे ९ विरुध्द ७ मतांनी विजयी झाले. कसलीही कल्पना नसताना पाटील यांचा पराभव झाल्याचा धक्का सत्तारुढ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तसेच कारभारी मंडळांना सहन करता आला नाही.

सर्वचजण सैरभैर झाल्यासारखे नेमकी माहिती घेण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. याच वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मेघा पाटील यांचे सासरे ए. वाय. पाटील , माजी आमदार नामदेवराव भोईटे, माजी महापौर आर. के. पोवार आदी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नगरसचिवांच्या कार्यालयात बसले होते.

शहर अध्यक्ष राजेश लाटकर हे तेथे धावतच आले आणि चव्हाण व पिरजादे यांनी गद्दारी केल्याची माहिती सांगितली. त्याक्षणी सगळेच अचंबीत झाले. काही क्षण काय बोलावे आणि काय नको अशीच सर्वांची मनस्थिती झाली. एकदम सन्नाटा पसरला. आनंदाची जागा धक्कादायक परावभाच्या वेदनेने घेतली. अशाही परिस्थितीत आर. के. पोवार यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगत दुसऱ्या मार्गाने सर्वांना बाहेर नेले.

मेघा पाटील यांना रडू कोसळले

निवडणुक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर कॉँग्रेसच्या सदस्यांसह मेघा पाटील बाहेर पडल्या. त्यांना दिपा मगदूम यांनी सभागृहा शेजारील स्थायी सभापतींच्या कक्षात नेले. त्यावेळी तेथे अनेक नगरसेविका होत्या. कल्पना नसताना स्वकीयांकडून झालेला घात सहन न झाल्याने मेघा पाटील यांना अक्षरश: रडू कोसळले.

दिपा मगदूम यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. प मगदूम सुध्दा रडायला लागल्या. नंतर हसिना फरास यांनीही मेघांना सावरण्याचा प्रयत्न केला. काही वेळापूर्वी विजयाच्या उत्साहात असलेल्या सर्व नगरसेविका पराभवाच्या दुखद छायेत बुडाल्या. त्या कक्षात एकच सन्नाटा होता. फक्त हुंदक्यांचा आवाज बाहेर पडत होता.

कमालीचा तणाव, कार्यकर्ते संतप्त

विरोधात मतदान झाल्याची माहिती बाहेर पडताच सभागृहा बाहेर जमलेल्या कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक, समथर्क, तसेच आशिष पाटील यांचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले. बंडखोरी करुन विरोधात मतदान करणाऱ्या अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांची बाहेर पडण्याची वाट पहात होते.

काहींनी त्यांना जाब विचारण्याची तयारी केली होती. परंतु भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवक कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षा कवच देत सभागृहातून बाहेर काढले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी मात्र तात्काळ बंदोबस्त वाढवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली.

Web Title: The unfortunate shock: Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.