चांदोलीत बोट उलटून दोन मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:29 AM2018-05-14T00:29:21+5:302018-05-14T00:29:21+5:30

Two children drowning after the chaos rolled and died | चांदोलीत बोट उलटून दोन मुलांचा बुडून मृत्यू

चांदोलीत बोट उलटून दोन मुलांचा बुडून मृत्यू

Next


आंबा : चांदोली लघुपाटबंधाऱ्याच्या जलाशयात बोट उलटून पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ दीपक पाटील (वय २०, रा. चांदोली) व शुभम विजय पाटील (१४, रा. मणेर मळा, उचगाव, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (१२, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याला वाचविण्यात यश आले. सायंकाळी ही दुर्घटना घडली.बोट उलटली त्या ठिकाणी पाण्याची खोली पंचवीस फुटांवर असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अख्खे गाव धरणावर आपत्कालीन यंत्रणा येण्याची वाट पाहत होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : शुभम पाटील व त्याचा मावस भाऊ सुमित हे दोघे तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरहून आजोळी सुटीस आले होते. आजी धोंडीबाई कुंभार यांच्या घराशेजारील गोपाळ पाटील याच्यासह हे दोघे चारच्या सुमारास धरणावर गेले. अंघोळ करण्यापूर्वी त्या तिघांनी धरणाशेजारील देशपांडे (पुणे) यांच्या प्लॉटिंगमध्ये नादुरुस्त पडलेली बोट जलाशयात आणून बोटिंग करण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक बोट उलटून तिघेही पाण्यात पडले. बोट उलटताच काठावर बसलेला अजय दीपक पाटील याने जलाशयात उडी मारून सुमितला पाण्याबाहेर काढले.
गोपाळ हा पट्टीचा पोहणारा, पण शुभमला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. हे वृत्त समजताच सारे गाव धरणावर धावले. शाहूवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली; पण साडेसातला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मदतपथक वेळाने आल्याने नातेवाइकांकडून नाराजी
शाहूवाडी पोलिसांनी सहाच्या सुमारास कोल्हापूर आपत्कालीन यंत्रणेला कळविले. नातेवाईक व ग्रामस्थ तीन तास मदतपथकाच्या वाटेकडे डोळे लावून होते; पण सायंकाळनंतर पाण्यात उतरत नसल्याचे मदत पथकाने स्पष्ट केल्याने नातेवाइकांत नाराजी पसरली. जलाशयात मत्स्य निमिर्ती केली जाते. मोठमोठे मासे जलाशयात आहेत. त्यामुळे त्वरित मृतदेह काढण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. आपत्कालीन यंत्रणा रात्रीपर्यंत न पोहोचल्याने रात्री उशिरा ग्रामस्थ धरणावरून परतले. शुभमची बहीण, आजी व गोपाळच्या नातेवाइकांनी धरणावर हंबरडा फोडला. दोन्ही कुटुंबातील नातेवाइकांचा आक्रोश ग्रामस्थांना सुन्न करणारा ठरला. गोपाळचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. तो लष्करात व पोलिसांत भरतीसाठी प्रयत्नशील होता. शुभम हा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे उचगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील व सदस्य अमर खोत यांनी घटनास्थळी भेट दिली.
या दुर्घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. या दुर्घटनेमुळे चांदोली आणि उचगाववर शोककळा पसरली आहे.
शुभम एकुलता एक
शुभम हा एकुलता होता. तो त्र्यंबोलीदेवी हायस्कूल उचगाव येथे सातवीत शिकत होता. त्याचे वडील कांदा-बटाटा टेम्पोवर चालक असून, त्याची आई एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामाला जाते. तिला माहिती मिळताच ती चांदोलीकडे रवाना झाली आहे, तर वडील रत्नागिरी येथे गेल्याने ते कोल्हापूर येथे घरी येण्यासाठी निघाले आहेत. सध्या शुभमच्या घरी आजी-आजोबा असून, त्यांना या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत दिलेली नव्हती.

Web Title: Two children drowning after the chaos rolled and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.