‘गडहिंग्लज’करांनी जगविली अडीच लाख रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:52 AM2019-06-21T00:52:06+5:302019-06-21T00:52:41+5:30

१३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षी एकूण तीन लाख ४२ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ५० हजार रोपे जगविण्यात यश आले आहे.

Twenty five lakh seedlings live by 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’करांनी जगविली अडीच लाख रोपे

‘गडहिंग्लज’करांनी जगविली अडीच लाख रोपे

googlenewsNext

राम मगदूम ।
गडहिंग्लज : १३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षी एकूण तीन लाख ४२ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ५० हजार रोपे जगविण्यात यश आले आहे. एकूण २७ विविध विभागांतर्फे ही झाडे लावण्यात आली आहेत. ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी तालुक्याला आठ लाख ९० हजार ११७ वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे.

महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस ठाणे, शासकीय विद्यार्थी वसतिगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वनविकास महामंडळ, सहायक निबंधक (सहकारी संस्था), पाटबंधारे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, गडहिंग्लज आगार, भूमिअभिलेख, उपकोषागार अधिकारी, रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्र, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण, महावितरण, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, आदी शासकीय व निमशासकीय विभागांसह विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांसह अनेक पर्यावरणप्रेमी व्यक्तींनीदेखील यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळेच या अभियानाला गती मिळाली आहे.

प्रामुख्याने तालुक्यातील सर्वच म्हणजे ८९ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. गेल्यावर्षी सर्व ग्रामपंचायतींनी मिळून ४३ हजार २१८ वृक्षांची लागवड केली होती. यावर्षी दोन लाख ५९ हजार इतकी झाडे ग्रामपंचायतीतर्फे लावली जाणार आहेत. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या शेंद्री, हडलगे, हनिमनाळ व हेब्बाळ येथील रोपवाटिकेत विविध प्रकारची सुमारे तीन लाख सत्तर हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.

शतकोटी वृक्षलागवडीच्या शासकीय अभियानाच्या आधीपासूनच गडहिंग्लज शहर आणि तालुक्यात वृक्षारोपणाची चळवळ गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबद्दल राज्यस्तरीय वनश्री पुरस्काराने गडहिंग्लज पालिकेचा गौरवही झाला आहे.
गडहिंग्लज नगरपालिका, गार्डन्स् ग्रुप आॅफ गडहिंग्लज, योग विद्या धाम, स्वामी विवेकानंद योग विद्या धाम, लायन्स क्लब, युनिव्हर्सल फ्रेंडस सर्कल व प्रयास, आदी सामाजिक संघटनांतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जातो. ‘प्रयास’ संस्थेतर्फे कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून सामानगड मार्गावर झाडे लावली आहेत. उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन ती जगविण्यात येत आहेत, यावरूनच गडहिंग्लजकरांच्या पर्यावरणप्रेमीची प्रचिती येते.


 


भडगाव (ता.गडहिंग्लज) येथे डोंगरावरील श्री गुड्डाई मंदिराच्या परिसरात सामाजिक वनीकरण विभागातर्फे लावण्यात आलेली झाडे. दुसऱ्या छायाचित्रात हडलगे येथील रोपवाटिकेत विविध जातींची रोपे तयार करण्यात आली आहेत.

Web Title: Twenty five lakh seedlings live by 'Gadhinglj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.