ठळक मुद्दे झेंड्याचा निर्णय योग्य वेळी : बहुजन समाजाची मोट बांधण्याचा निर्धार; शेतकरी संघटना राजकीय झाल्याचीही टीका सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे.शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून २०१९ ला होणारी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. कोणत्या पक्षातून लढायचे हा निर्णय योग्य वेळी घेऊ. केवळ विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर सर्व विचारांच्या लोकांना एकत्रित करीत बहुजन समाजाची मोट बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी लोकसभेच्या पाच निवडणुका जिंकल्या. निवेदिता माने यांनीही पाचपैकी दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे माने कुटुंबाला दीर्घ सामाजिक व राजकीय इतिहास आहे; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने आमच्या हातातून मतदारसंघ काढून घेऊन तो कॉँग्रेसला दिल्याने थांबावे लागले. लढाई थांबली की कार्यकर्ता थांबतो; त्यामुळे गेले अनेक दिवस माने यांनी पन्हाळा-शाहूवाडीपासून शिरोळपर्यंतच्या माने गटाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, माजी खासदार निवेदिता माने यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाबाबत ‘वेट अ‍ॅँड वॉच’ची भूमिका असून आज, गुरुवारपासूनच मतदारसंघातील वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात करणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व पक्षांत विखुरलेले आहेत. त्यांना सोबत घेऊन गटाची पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे माने यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका करताना माने म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली; पण जिल्हा परिषदेतील प्रेम मात्र कायम आहे. गेल्या वेळेलाही केंद्र व राज्यात कॉँग्रेसविरोधात पण जिल्हा परिषदेत त्यांच्यासोबत सत्तेत राहिले. त्यांचे सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे. संघटनेतून शेतकरी बाजूला पडला असून शेतकरी संघटना ‘राजकीय’ झाल्याची टीका माने यांनी केली.

माने गट अद्याप राष्टÑवादीतच
अद्याप आम्ही राष्टÑवादी सोडलेली नाही. पक्षाचा अक्रियाशील सदस्य असून वहिनीसाहेब मात्र क्रियाशील आहेत; पण पक्षाने आमचे प्ले-ग्राउंडच काढून घेतले. कॉँग्रेसला मतदारसंघ दिल्याने आम्हाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे, आतापर्यंत आम्ही लढा उभा केला म्हणूनच तरल्याचे माने यांनी सांगितले.
 

शेट्टी बहुजन समाजाविरोधात
राजू शेट्टी यांचे राजकारण हे बहुजन समाजाविरोधात असल्याचा कदाचित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अनुभव आला असेल. प्रश्न संपला की शेट्टींचे राजकारण संपले; त्यामुळे ते प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन करतात, हे आता लोकांच्या लक्षात आले असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, बारा बुलतेदारांसह बहुजन समाजाला बरोबर घेऊन आपण लढाई करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

भाऊंच्या पक्षविरहित संघटनेला पाठिंबा
बहुजन समाजातील म्हणून सदाभाऊंचे खच्चीकरण करण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले. त्यामुळे खोत यांनी यापूर्वीच हा निर्णय घेणे गरजेचे होते. शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे. सदाभाऊंनी पक्षविरहित संघटना काढली तर तिला आमचा पाठिंंबा राहणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांचा कोणा एकट्याला मक्ता दिला नसल्याचा टोलाही माने यांनी लगावला.

संभाजीराजे माझे मार्गदर्शक
खासदार संभाजीराजे यांच्याशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमची वाटचाल सुरू असून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पाऊल टाकणार असल्याचे माने यांनी सांगितले.