शिरोळमध्ये आज राजकीय भूकंप

By Admin | Published: January 9, 2017 12:56 AM2017-01-09T00:56:01+5:302017-01-09T00:56:01+5:30

मुंबईत आज प्रवेश : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५२ कार्यकर्ते भाजपमध्ये, आणखी काही नेते तयारीत

Today's political earthquake in Shirol | शिरोळमध्ये आज राजकीय भूकंप

शिरोळमध्ये आज राजकीय भूकंप

googlenewsNext

जयसिंगपूर/कोल्हापूर : कॉँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्यासह शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते, सेवा संस्थांचे पदाधिकारी व काही ग्रामपंचायतींचे सरपंच आज, सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथिगृहावर प्रवेश होणार आहे.
दरम्यान, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडे रविवारी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनिल यादव मुंबईला रवाना झाले.
नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय रणनीती सुरूआहे. कागलनंतर शिरोळ तालुक्यात राजकीय भूकंप घडविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरूहोते. त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील दोन्ही कॉँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर आहेत.
चार महिन्यांपूर्वी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, अभिजित जगदाळे, विजय भोजे यांच्यासह काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दोन्ही काँग्रेसमध्ये काम करणारे आणि विधानसभेत उल्हास पाटील यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष धनाजीराव जगदाळे त्याचबरोबर ‘गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष
माधवराव घाटगे, विजय मगदूम यांच्यासह जयसिंगपूर बाजार समितीचे सदस्य, सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे,
असा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी ठेवला होता. येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हे सर्वजण प्रवेश करतील, अशी शक्यता होती. मात्र, त्याला यश आले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरूअसलेल्या भाजप प्रवेशाला आता पूर्णविराम मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांचे भाजपसोबत सूर मिळाल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
जयसिंगपूर येथे झालेल्या बैठकीत बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय पक्का केला. त्यामुळे शिरोळ तालुक्यात दोन्ही काँग्रेसमधून अनेक वर्षे काम करणारे हे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. आज, सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. (प्रतिनिधी)
लाल दिव्याची शिरोळला उत्सुकता
गेल्या चार महिन्यांपासून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिल यादव यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. महामंडळासाठी ते इच्छुक असल्याची माहिती चर्चेत आली होती. भाजपमधील त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याने आता शिरोळ तालुक्याला लाल दिव्याच्या गाडीची उत्सुकता लागून राहिली आहे. बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांच्या निर्णयामुळे
तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात आता खळबळ
उडणार आहे.
दोन्ही काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर
हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील दोन्ही कॉँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर आहेत.
यादव व नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत ‘गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, दलितमित्र अशोकराव माने, धनाजीराव जगदाळे, विजय मगदूम यांच्यासह जयसिंगपूर बाजार समितीचे सदस्य, सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.

अनिल यादव यांचा शिरोळ काँग्रेसला रामराम
शिरोळ : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवीन तालुकाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून असले तरी स्वाभिमानीचे वर्चस्व व शिवसेनेचा आमदार अशी परिस्थिती काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची एकहाती सूत्रे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने जिल्हा भाजपमय करण्याचा विडा उचलला आहे. अशा परिस्थितीत शिरोळ तालुक्यातील दोन्ही काँग्रेसमधील काही प्रमुख कार्यकर्ते आज, सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
यादव यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना मानणारे कार्यकर्ते तालुक्यात आहेत. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडा माने यांच्या नावांची चर्चा आहे. तालुक्यात दिशाहीन काँग्रेसला अशा परिस्थितीत एकहाती नेतृत्वाची गरज आहे.
दरम्यान, सतरा वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना तालुक्यात पक्ष बळकट केला आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळींकडून पक्ष सोडू नये यासाठी मनधरणी झाली. मात्र, माझा निर्णय पक्का असल्याचे यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Today's political earthquake in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.