दहा हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:06 AM2018-06-02T01:06:35+5:302018-06-02T01:06:35+5:30

Ten thousand students awaiting scholarships | दहा हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

दहा हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

संतोष मिठारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्ट्रीय योजनेतून प्रोत्साहन भत्ता, पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शाळा शिष्यवृत्तीची प्रतीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील १०,७६५ विद्यार्थ्यांना लागली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आवश्यक ती माहिती शिक्षण संचालनालयाला सादर केली आहे. शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी-पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी पाचवी आणि आठवीसाठी शाळा शिष्यवृत्ती अनुक्रमे १००० रुपये आणि १५०० रुपये दिली जाते. माध्यमिक शाळांतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय योजनेतून तीन हजार रुपये इतका प्रोत्साहन भत्ता, अल्पसंख्याक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेअंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ६००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्यातील राष्ट्रीय योजनेअंतर्गतचा प्रोत्साहनपर भत्ता हा गेल्या पाच वर्षांपासून इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना मिळालेला नाही. त्यासह पाचवी व आठवीच्या एकूण १०७४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले तरी शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबत बँक खाते नंबर, आयएफसीसी कोड, आदी स्वरूपांतील आवश्यक ती माहिती बहुतांश विद्यार्थ्यांनी वेळेत भरली आहे. त्यासह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे येथील शिक्षण संचालनालयाला माहिती सादर केली आहे. तरीही प्रोत्साहनपर भत्त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून, तर शिष्यवृत्तीसाठी गेल्या एक वर्षापासून पात्र विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, याबाबत पुणे येथील शिष्यवृत्ती विभागाच्या अधीक्षक के. पी. मेश्राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची बिले जमा केली असून, बँकेच्या पातळीवरील कार्यवाही सुरू असल्याचे तसेच प्रोत्साहन भत्त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रोत्साहन भत्त्याबाबतची कोल्हापूरची आकडेवारी
वर्ष पात्र विद्यार्थ्यांची संख्या शाळांनी भरलेले अर्ज शाळास्तरावरील अंतिम मान्यता नसलेले अर्ज
२०११-१२ १५८६ १५८६ ०
२०१२-१३ २२७४ २२७४ ०
२०१३-१४ १३२४ १२९८ २६
२०१४-१५ २७२३ २७१२ ११
२०१५-१६ १८२३ १८२१ २

शाळापातळीवर ४९ प्रकरणे प्रलंबित
कोल्हापूर जिल्ह्यातील पाचवी व आठवी शिष्यवृत्तीची २० आणि प्रोत्साहन भत्त्याची ३९ प्रकरणे शाळा पातळीवर प्रलंबित आहेत. प्रोत्साहन भत्ता हा केंद्र सरकारकडून दिला जातो. त्यासाठी संबंधित विद्यार्थिनी पात्र ठरते का?, दहावीमध्ये ती उत्तीर्ण झाली अथवा नाही, आदी स्वरूपातील माहिती सादर करण्याची प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची आहे. त्यात राज्यातून एकत्रित माहिती केंद्राला सादर करण्यासाठी बराच कालावधी लागतो; त्यामुळे प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासह विलंब लागतो.

Web Title: Ten thousand students awaiting scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.