समाजशील ‘सीमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:56 AM2018-10-17T00:56:09+5:302018-10-17T00:56:22+5:30

संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमी... त्यामुळे स्टार्च केलेली टकाटक साडी नेसून दहा लाखांच्या गाडीतून फिरत व्यक्तिगत आयुष्य मस्तपैकी जगावे, असे जीवन ...

Socialist 'border' | समाजशील ‘सीमा’

समाजशील ‘सीमा’

Next

संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमी... त्यामुळे स्टार्च केलेली टकाटक साडी नेसून दहा लाखांच्या गाडीतून फिरत व्यक्तिगत आयुष्य मस्तपैकी जगावे, असे जीवन नशिबाने वाट्याला आले असताना या बार्इंना समाजबदलाचे वेड आहे. समाज परिवर्तनाच्या चळवळीत काम करण्यासाठी हल्ली लोक मिळत नसताना या बाई त्यासाठी कोणतेही अपेक्षा न ठेवता गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. सीमा रामदास पाटील असे त्यांचे नाव.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या. डाव्या पुरोगामी चळवळीत त्या झोकून देऊन काम करतात. सीमाताईंची ओळख निर्भीड, स्पष्टवक्ती महिला अशी आहे. कोणतेही काम हाती घेतले की ते समर्पित वृत्तीने तडीस न्यायचा त्यांचा स्वभाव आहे. त्यासाठी स्वत:चा वेळ, श्रम, पैसा त्या मुक्तपणे खर्च करतात.

डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी कोल्हापुरात प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला जातो. कितीही प्रापंचिक धावपळ असो; पाऊस-थंडी असो; त्या फेरीसाठी सीमा पाटील कधी चुकल्याचे आठवत नाही. त्यात त्यांचा सक्रिय पुढाकार असतो. त्यातून त्यांची वैचारिक बांधीलकीच उजळून निघते. चळवळीतील कोणतेही काम करताना त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. गेल्या महिन्यात ‘गांधींचं करायचं काय..?’ हे मुक्तनाटक इचलकरंजीतील स्मिता पाटील कलापथकाने सादर केले. मुलाच्या लग्नात एखादी आई जशी लग्नपत्रिका वाटण्यासाठी पळापळ करते, त्याहून जास्त सीमा पाटील या नाटकाची तिकिटे जास्तीत जास्त लोकांनी घ्यावीत यासाठी धडपडत होत्या. त्यामागे सध्या गढूळलेल्या वातावरणात गांधीविचार लोकांपर्यंत जावा, हीच त्यांची भावना होती.

जटामुक्तीचं त्यांचं काम तर खूपच मोठं आहे. त्या जणू जटा निर्मूलनाच्या बँ्रड अ‍ॅम्बॅसडरच आहेत. जटा काढण्यासाठी संबंधित महिलेला, तिच्या कुटुंबीयांना तयार करणे ही खूपच कष्टप्रद, चिकाटी आणि संयम लागणारी आणि अनेकवेळा त्रासदायक प्रक्रिया आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते के. डी. खुर्द म्हणतात त्याप्रमाणे जटा या केवळ केसांत नसतात, तर त्यांची मुळं मनापर्यंत गेलेली असतात. त्या मुळांपर्यंत जाऊन ती दूर करणे हे कार्यकर्त्यांचे खरे काम. या सर्वांतून जाऊन शेवटी
एखाद्या भगिनीला जटामुक्त केल्यावर तिच्या चेहºयावर फुललेलं समाधान हेच त्यांचे बक्षीस असते.
त्यांच्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार आईवडिलांकडूनच झाले आहेत. माहेरी कºहाड तालुक्यातील शिरगावला काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग. ग्रामदैवताचा कलशारोहण सोहळा होता. त्यासाठी सर्व माहेरवाशिणींना निमंत्रित केले होते. परंतु दर्शनाला आत जाताना एका मागासवर्गीय भगिनीला पुजाºयाने अडविले. सीमा पाटील यांनी त्यांच्याशी तार्किक वाद घालून त्या महिलेस प्रवेश देण्यास भाग पाडले. आज हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले आहे.
कथाकथनकार सीमा पाटील हा एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू खूप कमीजणांना माहिती आहे. स्त्रिया आणि अंधश्रद्धा, महिला सबलीकरण, स्त्रीशिक्षण, कौटुंबिक प्रश्न अशा स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा वेध घेणाºया एका अहिराणी भाषेतील कथेचे त्या खूपच प्रभावी सादरीकरणही करतात.

अंनिस’च्या चळवळीतील कार्यकर्ते हे नोकरी, व्यवसाय करणारे किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे असतात. त्यामुळे आकस्मिकपणे येणाºया अनेक कामांसाठी त्यांना वेळ नसतो. अशा प्रत्येक वेळी अभिमानाने पूर्णवेळ गृहिणी म्हणवून घेणाºया सीमाताई हातातील काम सोडून चळवळीच्या होतात. त्यामुळे चळवळीला आणि कार्यकर्त्यांनाही प्रचंड बळ मिळते.

परिवर्तनवादी चळवळीतील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्या नेहमीच आग्रही आणि कृतिशील असतात. त्यासाठी प्रत्येक पुरुष कार्यकर्त्याने आपल्या घरातील महिलांना चळवळीत आणले पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असतो. पुरोगामी चळवळीत सक्रिय असणाºया कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयही काहीवेळा चिंतित होतात; परंतु सीमा पाटील डगमगलेल्या नाहीत.

निर्धार असाही...
आईवडिलांनी मनात राष्ट्रवाद रुजवला म्हणून चळवळीत आले अशी त्यांची भावना आहे. चळवळीचे काम म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकºया भाजण्यासारखे; परंतु तरीही त्यांचे पती व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक रामदास पाटील त्यांना या कामांसाठी नेहमीच बळ देतात. दैववाद, कर्मकांडात अडकलेल्या समाजाला विज्ञानवादाकडे, मानवतेकडे नेण्यासाठी आयुष्य वेचावे असा त्यांचा निर्धार आहे.
 

अकरावीत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची प्रत्यक्ष भेट झाली व माझ्या जीवनाला नवा प्रकाश मिळाला. तेव्हाच ठरवलं होतं की आपणही हेच काम करायचं. आज त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरूनच चालण्याचा प्रयत्न करीत आहे.
- सीमा पाटीलअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या

Web Title: Socialist 'border'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.