शाहू पुतळा प्रस्ताव रखडणार

By admin | Published: March 23, 2017 12:27 AM2017-03-23T00:27:24+5:302017-03-23T00:27:24+5:30

शिल्पकार कोण असेल हे अनिश्चित : जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

Shahu statue will keep the proposal | शाहू पुतळा प्रस्ताव रखडणार

शाहू पुतळा प्रस्ताव रखडणार

Next

कोल्हापूर : कला संचालनालयाकडे शाहू महाराजांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल आणि शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे मंजुरीसाठी अंतिम रेखांकन सादर न केल्याने या दोघांचे अहवाल आल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या शाहू पुतळ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे हे काम रखडणार असल्याची चिन्हे आहेत. मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली. हे दोन्ही अहवाल त्वरित प्राप्त करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या ध्वजस्तंभासमोर राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुमारे तीस लाख रुपयांपर्यंतच्या निधीचेही नियोजन करण्यात आले. अजूनही प्रत्यक्षात निधीसंकलन झाले नाही; परंतु बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून
महापालिका, पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायांसह प्रस्तावाची फाईल २९ डिसेंबर २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली होती. हा प्रस्ताव अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ११ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता नसणे आणि मुख्य वास्तुशास्त्रज्ञांचा अहवाल नसणे यावर चर्चा झाली.या दोन्ही परवानग्या मिळाल्याशिवाय प्रस्ताव शासनाकडे सादर करता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. स्थानिक पातळीवरील ना हरकत दाखले जरी जिल्हा परिषदेने जोडले असले तरी अजूनही मुंबईतील हे दोन दाखले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, उपकार्यकारी अभियंता एम. टी. शिंदे उपस्थित होते.


शिल्पकार निश्चिती महत्वाची
१ जिल्हा परिषदेने अजूनही अधिकृतरीत्या शिल्पकार निश्चित केलेला नाही. यासाठी जी पुतळा समिती तयार करण्यात आली आहे ती जिल्हा परिषदेशी संलग्न करण्यात आली नाही.
२ कारण जिल्हा परिषदेच्या प्रक्रियेनुसार त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे ही अस्थायी समिती तयार करण्यात आली आहे. शिल्पकार निश्चित झाल्यानंतर त्यांच्याकडून क्ले मॉडेल करून घेऊन त्याला कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागेल.
३ पुतळ्याची उंची निश्चित झाली की चबुतऱ्याची उंची ठरवावी लागेल. हा खर्च जिल्हा परिषदेचे कंत्राटदार करणार आहेत. मात्र, त्यासाठीच्या रेखांकनाला मुख्य वास्तूशास्त्रज्ञांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळेच आता एकूण प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे.


शिल्पकार संताजी चौगले यांच्या नावाची चर्चा
बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करणारे शिये (ता. करवीर) येथील शिल्पकार संताजी चौगले यांच्याकडे या पुतळ्याचे काम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तशी प्राथमिक चर्चाही झाली होती. मात्र, तोपर्यंत आचारसंहिता सुरू झाल्याने पुढचे काम थांबले.

Web Title: Shahu statue will keep the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.