शालेय पोषण आहारात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:56 AM2017-11-18T00:56:47+5:302017-11-18T00:58:05+5:30

School nutrition scandal | शालेय पोषण आहारात घोटाळा

शालेय पोषण आहारात घोटाळा

googlenewsNext


कोल्हापूर : शालेय पोषण आहाराचे आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील वाटप पूर्ण होऊनही अतिरिक्त तांदळाच्या पोत्यांचा साठा शुक्रवारी ठेकेदार धनराज भुतडा यांच्या मार्केट यार्ड परिसरातील गोदामात आढळून आला.
या पोत्यांमध्ये असणारा शालेय पोषण आहारातील तांदूळ काढून तो खासगी पोत्यात भरून खुल्या बाजारात विकून ‘मापात पापा’चा गोरखधंदा संबंधित ठेकेदाराकडून होत आहे, असा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शाळांना पुरविण्यात येणाºया शालेय पोषण आहारातील तांदळाचे आॅक्टोबर-नोव्हेंबरमहिन्यातील वाटप पूर्ण होऊनही मार्केट यार्ड परिसरातील भुतडा यांच्या गोदामात तांदळाच्या पोत्यांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिलीप देसाई हे सायंकाळी जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार विभागाचे वरिष्ठ साहाय्यक पी. के. बोरकर व करवीर पंचायत समितीच्या अधीक्षक भारती कोळी यांना घेऊन या गोदामाकडे गेले. या ठिकाणी त्यांनी ठेकेदार भुतडा यांना नोव्हेंबर महिन्यातील तांदळाचे वाटप पूर्ण झाले असताना येथे तांदळाची पोती कशी शिल्लक आहेत? अशी विचारणा केली? यावर ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
यावर दिलीप देसाई म्हणाले, शाळांना किती धान्य द्यायचे त्या प्रमाणात हे ठेकेदार ते संबंधित यंत्रणेकडून उचलतात. त्यानुसार या ठेकेदारांनी जितका माल उचलला आहे, तितकाच शाळांना पुरवठा केला असे रेकॉर्ड जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. तसेच अद्याप डिसेंबर महिन्यातील तांदूळही या ठेकेदाराने उचललेला नाही. त्यामुळे या गोदामात असलेला हा तांदूळ कोणता? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर म्हणजे ५० किलोच्या तांदळाच्या पोत्यातून सरासरी १५ ते २० किलो तांदूळ काढून घेऊन भरून ठेवलेली ही पोती आहेत. सरकारी पोत्यातील तांदूळ काढून तो खासगी पोत्यात भरून खुल्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. या शिल्लक साठ्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेला माहिती देणे गरजेचे असताना त्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. या गोदामात तांदूळ ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांची परवानगी लागते, ती घेतलेली नाही.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष
यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना ई-मेलद्वारे कळवूनही या गोदामाकडे यायला कोणीही तयार नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे समजत नाही, अशी विचारणा देसाई यांनी केली. शिंगणापूर येथील अपहारप्रकरणी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला नाही, तर न्यायालयात दाद मागू असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयापासून खालीपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी
या गोदामातील वजनकाटे हे वैधमापन झालेले नाहीत. येथील कोणताही वजनकाटा हा शासनमान्य परवानगीचा नाही. एकंदरीत मंत्रालयापासून खालीपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. मुख्यमंत्री यात लक्ष घालणार आहेत की नाही? त्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ते कोल्हापुरात आल्यावर त्यांच्या गाडीच्या आडवे जाऊन जाब विचारू, असा इशारा देसाई यांनी दिला.
पंचनाम्यात ‘सील’ नसलेली ६२ पोती आढळली
गोदामातील पोत्यांचा जि.प.चे वरिष्ठ साहाय्यक बोरकर यांनी पंचनामा केला. यामध्ये ‘एफसीआय’चे सील असलेली तांदूळ भरलेली २३९ पोती, तर रिकामी १२५ पोती आढळली. तसेच सरकारी सील नसलेली परंतु तांदळाने भरलेली ६२ पोतीही आढळली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाहीसाठी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली जाईल, असे म्हटले आहे.

Web Title: School nutrition scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.