Lok Sabha Election 2019 : भविष्यात सतेज पाटील अडचणीत येतील :जयंत पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:34 PM2019-03-24T18:34:28+5:302019-03-24T18:44:29+5:30

राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी भाजपविरोधी आघाडी आकाराला आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्यास उज्ज्वल भविष्यकाळ असलेल्या सतेज पाटील यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी दिला आहे.

Sataj Patil will be in crisis now: Warning of Jayant Patil | Lok Sabha Election 2019 : भविष्यात सतेज पाटील अडचणीत येतील :जयंत पाटील यांचा इशारा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी कॉँग्रेस कमिटीमध्ये जाऊन नेत्यांचीच भेट घेतली. यावेळी डावीकडून धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, प्रल्हाद चव्हाण, प्रकाश सातपुते, सरलाताई पाटील उपस्थित होत्या. (छाया- दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देभविष्यात सतेज पाटील अडचणीत येतील :जयंत पाटील यांचा इशाराकॉँग्रेसच्या जाजमावर राष्ट्रवादीचे नेते

कोल्हापूर : राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी भाजपविरोधी आघाडी आकाराला आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्यास उज्ज्वल भविष्यकाळ असलेल्या सतेज पाटील यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी दिला आहे.

जिल्हा कॉँग्रेस कार्यालयात झालेल्या दोन्ही कॉँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. शनिवारी राज्यामध्ये कॉँग्रेस आघाडी जाहीर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी कोल्हापूरला धाव घेत कॉँग्रेसकडे सहकार्याचा हात मागितला. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, महापौर सरिता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, मागील चार-पाच वर्षांत काय झालं याच्या खोलात मी जात नाही; परंतु राष्ट्रीय स्तरावरून आघाडी झाल्यानंतर आता तुम्ही महाडिक यांना आशीर्वाद द्यावा, यासाठी मी येथे आलो आहे. महाडिक कर्तबगार आहेत. संसदेत बोलणारा खासदार पुन्हा पाठविला पाहिजे. मंडल आयोगाचा फेरविचार करून मोदी सरकार देश पुन्हा चार्तुवर्ण्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला.

मुश्रीफ म्हणाले, पवार आणि राहुल गांधी यांनी ठरविल्यानंतर आता अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आता मतभेद पंचगंगेत बुडवूया. कॉँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. काही कारणांनी वेगळे झालो होतो; पण आता आम्हांला पदरात घ्या.

पी. एन. पाटील म्हणाले, गेल्या २० वर्षांत आम्ही कॉँग्रेस सोडून कधी विचार केला नाही. देशात चुकीचे सरकार आल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास झाला. संस्था मोडकळीला आल्या. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कॉँग्रेस समितीमध्ये कधी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष आला नाही. मात्र यावेळी प्रदेशाध्यक्षांना येथे यावे लागले, अशी आठवण ‘पी. एन.’ यांनी करून दिली.

धनंजय महाडिक म्हणाले, मोठ्या मनाने दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आभार मानतो. जुन्या काही गोष्टींमुळे कार्यकर्त्यांची मने दुखावली असतील तर त्या चुका दुरुस्त केल्या जातील. राज्य सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी स्वागत केले.

यावेळी संजीवनी गायकवाड, ए. वाय. पाटील, मानसिंग गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, युवराज पाटील, भैया माने, अनिल साळोखे, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, नाना गाठ, आदिल फरास, राहुल आवाडे, वसंत खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, रामराजे कुपेकर, राजूबाबा आवळे, सरलाताई पाटील, संगीता खाडे, देवयानी साळुंखे, संध्या घोटणे, जहिदा मुजावर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पांघरूण घालून पुढं जाऊया

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, मी याआधीही सतेज पाटील यांना भेटलो आहे. सहकार्य करण्याची त्यांना विनंती केली आहे. त्यांचे काही स्थानिक मतदारसंघातील प्रश्न आहेत. प्रत्येकाचा सुभा राखण्याच्या नादात भांड्याला भांडं लागतं. काही वेळा एखादं पाऊल मागंपुढं होतं; परंतु व्यक्तीचा विचार न करता पक्षीय राजकारण महत्त्वाचे मानले पाहिजे. आता जे झाले त्यावर पांघरूण घालून पुढं जाऊया असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले.

झाकून ठेवून प्रश्न सुटणार नाही

आवाडे यांनी यावेळी स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, याआधी सगळं बरं चाललं होतं असं नाही. गेल्या वेळी दोन्ही कॉँग्रेसनी प्रयत्न केले आणि महाडिक निवडून आले. नंतरच्या काळात आपण सर्वजण स्वतंत्रपणे लढलो. यावेळी टोकाचे मतभेद झाले. आम्ही, सतेज पाटील, हसन मुश्रीफ एकत्रच काम करीत होतो. मात्र काही घटक भाजपशी जवळीक साधून होते. झाकून ठेवून प्रश्न सुटणार नाहीत. पोटात दुखत असेल तर सांगितल्याशिवाय औषध कसे देणार? आता परत वाद वाढवून भांडायचं की नवी आव्हानं पेलायची हा प्रश्न आहे. खोटं बोलून काही होणार नाही. आमच्यात काही नाही असं नाही. मात्र दोन्ही उमेदवारांना आता १०० टक्के निवडून देणार आहोत.

विधानसभेला सुटं सुटं करू नका

आपण सतेज पाटील यांना भेटणार आहोत. पुन:पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र यापुढं विधानसभेला सुटं-सुटं करू नका. तसं केलं तर जनता आम्हांला माफ करणार नाही. एकदा झालं की झालं असं करू नका, असे सांगत एकीकडे जयंत पाटील यांना आवाहन करताना आवाडे यांनी महाडिक यांनाही टोला लगावला.

सतेज पाटील समर्थक अनुपस्थित

या बैठकीला आमदार सतेज पाटील यांचे समर्थक अनुपस्थित होते. एरवी कॉँग्रेस कमिटीमध्ये गर्दी करणाऱ्या नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरविली.


 

 

Web Title: Sataj Patil will be in crisis now: Warning of Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.