ऋषितुल्य तपस्वी जीवनलाल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:08 AM2019-04-15T00:08:34+5:302019-04-15T00:08:39+5:30

इंद्रजित देशमुख एखादा माणूस वयाची ८५ वर्षे पूर्ण केली तरी समाजस्वास्थ्यासाठी झटत राहतो. सर्वसामान्यांना आरोग्याच्या संदर्भात सदैव जागृत राहण्यासाठी ...

Rishikulya ascetic lifelil Gandhi | ऋषितुल्य तपस्वी जीवनलाल गांधी

ऋषितुल्य तपस्वी जीवनलाल गांधी

Next

इंद्रजित देशमुख
एखादा माणूस वयाची ८५ वर्षे पूर्ण केली तरी समाजस्वास्थ्यासाठी झटत राहतो. सर्वसामान्यांना आरोग्याच्या संदर्भात सदैव जागृत राहण्यासाठी लेखन, समुपदेशन व वैद्यकीय आणि आहारविषयक सल्ला देऊन त्यांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही. अशा ऋषितुल्य तपस्वी, तेजस्वी व तत्पर माणसाचे नाव आहे डॉ. जीवनलाल गांधी.
आज डॉक्टर म्हटलं की, किमान ५०० रुपये खर्च हे गृहीत धरले जाते; पण डॉ. गांधी याला अपवाद आहेत. आपल्याकडे आलेला रुग्ण अल्पोपाहार व सरबत घेऊन गेला पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आपण आपला आहार नीट घेतला, प्रसंगी उपवास केला, निसर्गाच्या सहवासात राहिलात, हंगामी फळांचा वापर केल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकते, असा मोलाचा उपाय ते सांगतात. नुसता सांगून थांबत नाहीत, तर तो उपाय ते स्वत:ही उपयोगात आणतात.
‘प्रकृती बिघडल्यास आपला आहार कारणीभूत आहे व त्यावर नियंत्रण ठेवलं तर प्रकृती ठणठणीत राहू शकते’, हा त्यांचा गुरुमंत्र. कोणतेही औषध न घेता आजार केवळ आहाराच्या जोरावर बरा करणारा हा ‘देवमाणूस’ आहे, यात वाद नाही. डॉ. गांधी हे डोंगरे महाराज, रामसुखदासजी महाराज, विद्यासागरजी, महर्षी महेशयोगी, श्री श्री रविशंकर अशा थोर व्यक्तींच्या सहवासात राहिले. त्यांचा बराचसा काळ परदेशातही गेला, पण...
‘‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’’
या न्यायाने ते विदर्भातील अमरावतीला परतले. त्यांनी याही वयात जो ज्ञानआरोग्य यज्ञ प्रारंभलेला आहे, तो अनेकांना जीवनामृत देणारा आहे. डॉक्टरांचा जन्म सावरगाव नेहू (जि. बुलडाणा) येथे ५ आॅक्टोबर १९३३ रोजी झाला. सावरगाव नेहू हे निसर्गसांैदर्याने नटलेले गाव. गाव दोन्हींकडून नदीने वेढलेले असल्याने त्याकाळी पावसाळ्यात आवागमन शक्य नव्हते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सावरगाव नेहू येथे झाले, तर पाचवी ते अकरावीपर्यंत गव्हर्न्मेंट हायस्कूल, अकोला व इंटर सायन्स विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे झाले. वैद्यकीय शिक्षण एमएफएएम (अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदिक) हा इंटिग्रेटेड कोर्स त्यांनी केला. एमबीबीएसचे अ‍ॅडमिशन सोडून आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी हा संयुक्त कोर्स त्यांनी हेतूपुरस्सर पूर्ण केला.
योगाभ्यासासाठी ते डॉक्टर स्वामी शिवानंद सरस्वती, ऋषीकेश (उत्तर प्रदेश) येथील योगाश्रममध्ये सहा महिने राहिले. निसर्गोपचार प्रशिक्षण त्यांनी प्राकृतिक चिकित्सालय, हैदराबाद येथे डॉ. बी वेंकट राव यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. प्रारंभी त्यांनी मलकापूर (विदर्भ) येथे अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस केली. नंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस सोडून योग व निसर्गोपचारद्वारे चिकित्सा सेवेचे क्षेत्र निवडले. त्यांना असे अनुभवाला आले की, दीर्घकालीन व्याधीच्या रुग्णांना अ‍ॅलोपॅथिक उपचाराने काही काळ लाभ मिळतो, परंतु तोच आजार कालांतराने पुन्हा होऊन रुग्णाचे देहावसान होते. चिरंतन लाभ देणाऱ्या योग व निसर्गोपचाराची कास धरली. परदेशात निसर्गोपचार शिकून आल्यानंतर कमला आरोग्य मंदिर, यवतमाळ व अकोला येथे काशीबाई कोठारी आरोग्य आश्रम येथे त्यांनी प्रमुख चिकित्सक या पदावर कार्य केले.
स्वित्झर्लंड येथे नॅचरोपॅथी योग व आयुर्वेद येथे संशोधन व प्रमुख चिकित्सक आणि प्रशिक्षक या नात्याने सहा वर्षे कार्य केले. या काळात योग, निसर्गोपचार व आयुर्वेद उपचार, प्रचार व संशोधनाचे कार्य अमेरिका, जर्मनी, हॉलंड या देशांत केले. स्वास्थ्य साधन केंद्र जोधपूर व महावीर जैन यांचे प्रमुख धार्मिक स्थळ, राजस्थान येथे वरिष्ठ प्रमुख चिकित्सक म्हणून अनेक वर्षे कार्य केले. स्वस्थ जीवनशैली, स्ट्रेस मॅनेजमेंट, नैसर्गिक आहार, योगाभ्यास, निसर्गोपचार यांबाबत अनेक सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, तसेच रेडिओ व टीव्हीवर भाषणे, इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग व वक्ता म्हणून कार्य केले.
हिंदी भाषेत विविध दैनिकांमध्ये त्यांनी लिखाण केले. योग निसर्गोपचारावरील कुटुंब स्वास्थ्य व कल्याण मंत्रालय, भारत सरकार, दिल्लीद्वारे पुरस्कृत व प्रशंसाप्राप्त ‘स्वास्थ्य सबके लिये’ पुस्तकाचे लेखक, मराठीतील पुस्तक ‘आरोग्यम् धनसंपदा’ नावे शब्दजा प्रकाशन, अमरावती येथून प्रकाशित तसेच ‘आहार हेच औषध’ हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
उतारवय असल्याने डॉ. गांधी अमरावती येथे वास्तव्यास आले. येथे त्यांचा ‘प्रयास - सेवांकुर’चे डॉ. अविनाश सावजी यांच्याशी परिचय झाला. डॉ. सावजींची समाजातील वंचित घटकांसाठी नि:स्वार्थ सेवा बघून त्यांनी सोबत काम करण्याचे ठरविले. यातूनच किडनीग्रस्त व निराश रुग्णांसाठी योग निसर्गोपचार व आहारद्वारे उपचाराचा प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी अमरावती येथे निवासी शिबिरांचे आयोजन करून त्यात डॉ. गांधी १२ ते १४ तास मार्गदर्शन करत
आणि त्यांच्या अर्धांगिनी स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळत.
ते म्हणतात की, माझे वय ८७ वर्षांचे झाल्याने मला वेळ कमी आहे आणि मला जे काही ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांना वाटायचे आहे. त्यासाठी त्यांचा लेखन प्रपंच तसेच प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून सेवा व मार्गदर्शन अविरतपणे सुरू आहे.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)

Web Title: Rishikulya ascetic lifelil Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.