प्रॅक्टिस-मेननचा ‘धारदार’ खेळाडू

By admin | Published: January 28, 2017 01:07 AM2017-01-28T01:07:27+5:302017-01-28T01:07:27+5:30

--शरद मंडलिक

Practice-Menon's 'sharp' player | प्रॅक्टिस-मेननचा ‘धारदार’ खेळाडू

प्रॅक्टिस-मेननचा ‘धारदार’ खेळाडू

Next

मंडलिक घराण्याला फुटबॉलचा मोठा वारसा आहे. हा वारसा शरदने समर्थपणे चालवला. प्रॅक्टिस क्लबकडून खेळताना त्याने स्थानिक तसेच बाहेरगावी झालेल्या अनेक स्पर्धा गाजवल्या. फुटबॉलमध्ये कारकिर्द घडवत असताना त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. हा आदर्श सध्याच्या खेळाडूंनी घेण्यासारखा आहे.

शरद रंगराव मंडलिक यांचा जन्म ४ आॅगस्ट, १९५० ला कोल्हापूर येथे झाला. मंगळवार पेठेतील मंडलिक घराणे फुटबॉलशी फार निगडित आहे. मंडलिकांच्या घरातील घरटी एक तरी फुटबॉल खेळाडू सापडणारच. सुरेश मंडलिक (प्रॅक्टिस), बाळकृष्ण मंडलिक (बाळगोपाल), बाजीराव मंडलिक, अनिल, रोहित व मोहित अशी मंडलिक घराण्यातील खेळाडूंची फळी. त्यातच आपल्या धारदार, चतुरस्र खेळाने रसिक प्रेक्षकांचे मन मोहित करणारा ‘शरद मंडलिक.’
साठमारी, शाहू मैदान, गांधी मैदान, शाहू, दयानंदचे मैदान, बऱ्याच वेळा मैदान उपलब्ध नाही झाले तर प्रभाकर स्टुडिओ, नजीकच्या शेतवडीतील रिकामी जागा. रेसकोर्स रस्ता या विविध मैदानांवर शरदचा फुटबॉल प्रगत झाला. शरदच्या घरातील सर्वांना शैक्षणिक वारसा लाभला होता. त्यामुळे लहानपणापासूनच खेळासह त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे कुटुंबीयांनी दक्षतेने लक्ष ठेवले. भक्तिसेवा-विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शरदने समवयस्क लहान मुलांतून फुटबॉलचे धडे गिरविले. रबरी किंंवा टेनिस बॉलच्या साहाय्याने प्रॅक्टिस क्लबमधील मोठ्यांचा खेळ पाहून टेनिस बॉलवरच फुटबॉल खेळाचे तंत्र (टेक्निक) आत्मसात केले. कोल्हापुरात पूर्वी चार फूट ११ इंच मापाचे सामने पेठा- पेठांमधून चालत असत. हे सामने पाहण्यास भरपूर गर्दी असे. प्रॅक्टिस क्लबच्या या मिनी क्लबकडून शरद मिळेल त्या जागेवर खेळत असे. विद्यापीठ हायस्कूलच्या शालेय संघातून तो विशेष चमकला. शरदने वयाच्या १६ व्या वर्षांपासून फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. २० वर्षांची कारकीर्द त्याने आपल्या खेळाने गाजवून सोडली. शरदचे नातेवाईक मामा कै. आप्पा सूर्यवंशी व यशवंतराव आणि बाबा सूर्यवंशी हे प्रॅक्टिस क्लबचे एकेकाळचे गाजलेले फुटबॉल खेळाडू. त्यांनी शरदला प्रेरणा दिली व तेच त्याचे प्रशिक्षक होते.
शरदचा शिडशिडीत बांधा, कमालीचा आत्मविश्वास. शरीर घोटीव आणि कमालीची चपळता. पोहण्याच्या सरावामुळे शारीरिक हालचाली गतिमान आहेत. फुटबॉलमधील सर्व किक्स, ट्रॅपिंंगचे प्रकार आत्मसात. शरदची साईड व्हॉली आणि लो-ड्राईव्ह किक कमालीची होती. त्याची सुरुवातीची संघातील खेळण्याची जागा लेप्ट इन होती. मात्र, संघाच्या गरजेनुसार नंतर सेंटर हाफ या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर खेळू लागला.
प्रॅक्टिसची ही टीम फार भक्कम होती. कित्येक स्थानिक स्पर्धांतून शरद खेळला असून, त्यांने आपला ठसा रसिकांच्या मनावर उमटविला होता. शिवाय मिरज, सांगली, गडहिंंग्लज, बेळगाव, पुणे व मानाचा रोव्हर्स चषक खेळण्याची संधी त्याला मिळाली. बाहेरगावी आपल्या चौफेर खेळाने तेथील स्पर्धा शरदने गाजविल्या आहेत. त्याच बरोबर शिवाजी विद्यापीठ पश्चिम विभागातील स्पर्धांकरिता त्याची सलग दोन वेळा निवड झाली होती. या स्पर्धाही शरदने आपल्या खेळाने गाजवल्या.
शरदने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. फुटबॉल स्पर्धा गाजवितच तो इंजनिअरिंगमधील डी.एम.ई. ही पदविका पास झाला. त्याला ‘मेनन अ‍ॅड मेनन’ या कारखान्यात इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. शरदचे उदाहरण केवळ फुटबॉल खेळून शिक्षणाकडे लक्ष न देता आपले करिअर वाया घालविणाऱ्यांसाठी आदर्शवत आहे. कोल्हापुरात आज असे कित्येक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत; पण त्यांची शैक्षणिक प्रगती नाही. शरदच्या सुदैवाने मेननच्या मालकांनी निवडक खेळाडू घेऊन एक चांगला, दर्जेदार फुटबॉल संघ बांधला होता. शरद या संघाचा कणा होता. कित्येक दिग्गज खेळांडू या संघात होते.
शरदच्या मते खेळामुळे आरोग्य चांगले, निरामय राहिले. आजही अव्याहत पोहणे सुरू आहे. याशिवाय शरदने क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, बांबूउडी या सर्व खेळांत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. कोल्हापुरात शरदने फुटबॉल पंच म्हणूनही काम केले आहे. शिवाजी तरुण मंडळ व प्रॅक्टिस यांच्यामध्ये तीन दिवस हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगलेला सामना त्याला आजही आठवतो. त्याच्या मते ‘अजूनही फुटबॉल खेळात प्रगती नाही.’
(उद्याच्या अंकात : माणिक मंडलिक)

Web Title: Practice-Menon's 'sharp' player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.