प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:50 AM2018-05-14T00:50:34+5:302018-05-14T00:50:34+5:30

Pollution is the root of the struggle | प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

Next

राजाराम पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा या
दोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेच
पाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा काही विचित्र अवस्थेत ही नळ योजना सापडली आहे.
इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला सरकारने मंजुरी देऊन दीड वर्ष आणि निविदा मंजूर करीत काम सुरू करण्याचे आदेश देऊन तेरा महिने उलटले आहेत. मात्र, प्रत्यक्ष योजना राबविण्यासाठी काहीही प्रगती
झाली नाही. आता वारणा बचाव
कृती समितीच्या आंदोलनाला इचलकरंजीत प्रतिआंदोलन उभे राहिल्याने संघर्ष अटळ ठरत आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजीत संस्थानकालीन पाणीपुरवठा होता. त्यावेळी आॅईल इंजिन व पंपाद्वारे पंचगंगेतील विनाप्रक्रिया केलेले पाणी शहरास पुरविले जात होते. विविध ठिकाणी असलेले हौद व मोठे तळे येथे सोडण्यात आलेले पाणी नागरिक घागरी भरून घेऊन घरी नेत आणि त्याचा वापर करीत.
सन १९६० नंतर मात्र कापडाला मागणी वाढल्यामुळे साहजिकच यंत्रमाग उद्योगात वाढ झाली. त्यामुळे लोकसंख्येतही लक्षणीय वृद्धी झाली. साधारणत: एक लाख लोकसंख्येच्या वस्त्रनगरीसाठी तत्कालीन नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. त्यावेळी सुद्धा स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र नसले तरी ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन सार्वजनिक नळाद्वारे नागरिकांना पाणी पुरविले जात होते.
पंचगंगा नदीवर दहा दशलक्ष लिटर क्षमतेची नळ योजना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. तिची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम आठ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते आहे, तर पंचगंगा दूषित झाल्यामुळे सन २००० मध्ये कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ४५ दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली या योजनेची दाबनलिका गळतीमुळे ग्रासली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, या योजनेमार्फत दररोज ३० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळत आहे.
शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज ५४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असूनसुद्धा पंचगंगा व कृष्णा
या दोन्ही योजनांतून केवळ ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याने नेहमीच दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.
कोल्हापूर, इचलकरंजीचा प्रदूषणात वाटा
उन्हाळ्यामध्ये पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यामुळे पंचगंगेचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.
कृष्णेच्या पाण्यावरच शहरवासीयांना
पाणी दिले जाते. त्यामुळे तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.
उन्हाळ्यात पंचगंगा दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. पंचगंगा अक्षरश: गटारगंगा होते.
आता पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीतील पाणीसुद्धा दूषित होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता शहरवासीयांसाठी वारणा नदीतून पाणी आणणारी योजना शासनाकडून राबवली जाणार आहे.

Web Title: Pollution is the root of the struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.