Police look into 60 lenders: Investigation | साठ सावकारांवर पोलिसांची नजर चौकशी सुरू : तथ्य आढळल्यास गुन्हे

एकनाथ पाटील।
कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे साठ खासगी सावकारांविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यानंतर व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जात आहे. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा ५ ते १० टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार हतबल होत आहे.

जिल्ह्यात खासगी सावकारांचे पेव फुटल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक मोहिते यांनी, जिल्ह्यात सावकारांकडून ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे सावकार वसुलीसाठी तगादा किंवा दमदाटी करीत असतील तर नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. सावकारांच्या धमकीला बळी पडू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन केले होते.

त्यानुसार हुपरी, भुदरगड, गारगोटी, इचलकरंजी, जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, कागल, चंदगड, आजरा, करवीर, कोडोली, सातवे, पन्हाळा, कोतोली, कळे, वडणगे, शिये, शिरोली एम. आय. डी. सी., गांधीनगर, वळिवडे, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव यांसह शहरातील कावळा नाका, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, बोंद्रेनगर, आर. के. नगर, सदर बझार, आदी ठिकाणांहून साठ सावकारांच्या विरोधात अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून प्रत्येक अर्जाची कसून चौकशी सुरू आहे.


शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे.
गरीब लोकांचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत.

 

जिल्ह्यातील खासगी सावकारकी मोडून काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार रोज तीन-चार अर्जांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा


Web Title:    Police look into 60 lenders: Investigation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.