पोलीस कॉन्स्टेबल, महिलेसह चौघांना अटक : शिरोळमधील टेम्पोचालक आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:12 AM2017-12-08T01:12:23+5:302017-12-08T01:13:49+5:30

शिरोळ : येथील टेम्पोचालक राजाराम माने याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाºया पोलीस कॉन्स्टेबलसह संशयितांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी

 Police Constable, woman arrested with four accused: Shirom's tempo driver suicides | पोलीस कॉन्स्टेबल, महिलेसह चौघांना अटक : शिरोळमधील टेम्पोचालक आत्महत्या प्रकरण

पोलीस कॉन्स्टेबल, महिलेसह चौघांना अटक : शिरोळमधील टेम्पोचालक आत्महत्या प्रकरण

Next
ठळक मुद्देशिरोळ कडकडीत बंद; संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडीशिरोळमध्ये घडलेला प्रकार हा गंभीर आहेच.

शिरोळ : येथील टेम्पोचालक राजाराम माने याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाºया पोलीस कॉन्स्टेबलसह संशयितांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी शिरोळ बंद ठेवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस कॉन्स्टेबल भुजंग रामचंद्र कांबळे (वय ३४, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) याच्यासह निखिल ऊर्फ भाऊ बाबूराव खाडे (२९) व शशिकांत संभाजी साळुंखे (३६, दोघे रा. घालवाड) तसेच संशयित महिला स्वाती दशरथ माने (२४, रा. म्हसोबा गल्ली, जवाहरनगर इचलकरंजी) या चौघांना अटक करून जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले.
सकाळी येथील पंचगंगा नदीकाठावर रक्षाविसर्जनासाठी नातेवाइकांसह ग्रामस्थ जमले होते. याचवेळी उपस्थित असणारे करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक उदय डुबल यांना ग्रामस्थांनी संशयित आरोपींना का अटक केली नाही, असा जाब विचारला. यावेळी चौघा आरोपींना अटक केल्याची माहिती गुरव यांनी दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थ शांत झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने शिरोळ पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांची भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक करावी, या मागणीसाठी शिरोळ ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंदची हाक दिली होती. अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी दुसºया दिवशी जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी शिरोळमध्ये भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.
 

पोलिसांशी संपर्क साधावा  जिल्हा पोलीसप्रमुख
आत्महत्येप्रकरणी तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. खाडे याच्या माध्यमातून मृत राजाराम व महिलेची ओळख झाली होती. यातूनच खाडे याने बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, असे सांगत माने याच्याकडून पैसे उकळले होते. ज्यावेळी पैसे दिले जात होते त्यावेळी खाडेसोबत भुजंग कांबळे असायचा, अशी माहिती पुढे आली आहे. विशेष पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पाचवा संशयित आरोपी शिंदे याचाही शोध सुरू आहे. तपासात ज्या ज्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगच्या घटना घडल्या असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी येथे केले.

कॉल डिटेल्सवरून गुन्ह्याचा तपास
गुरुवारी संशयितांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. मृत माने याच्या आत्महत्येप्रकरणी तपास करायचा आहे. संशयितांना देण्यात आलेली पावणेदोन लाख रुपयांची रक्कम हस्तगत करायची आहे. आणखी कोणी साथीदार होते शिवाय शिंदेनामक पाचवा संशयित कोण आहे, त्याबाबत तपासासाठी चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीचा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी न्यायालयात केला. दरम्यान, सात दिवसांची पोलीस कोठडी संशयितांना मिळाली असून, संशयितांच्या कॉल डिटेल्सबाबत तपास सुरू झाला आहे.


सखोल चौकशी करण्याची उल्हास पाटील यांची मागणी
शिरोळ : शिरोळ येथील राजाराम महादेव माने या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

पोलीस कॉन्स्टेबल निलंबित, डूबल नियंत्रण कक्षाकडे : मोहिते

कोल्हापूर : शिरोळ येथील टेम्पोचालक राजाराम महादेव माने यास जातिवाचक गुन्ह्यात अडकविण्याची धमकी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय डुबल यांची गुरुवारी नियंत्रण कक्षाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली; तर अटकेतील पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. दरम्यान, जयसिंगपूरचे वादग्रस्त ठरलेले पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे समजते.

गुरुवारी दिवसभर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते हे शिरोळमध्येच ठिय्या मारून होते. यावेळी नागरिकांनी जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांचीही तत्काळ बदली करण्याची व तपास ‘सीआयडी’मार्फत करण्याची मागणी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.अधीक्षक मोहिते म्हणाले, शिरोळमध्ये घडलेला प्रकार हा गंभीर आहेच. त्याची नि:पक्षपणे चौकशी होण्यासाठी तेथील पोलीस निरीक्षक डुबल यांची बदली करण्यात आली आहे. पदभार तेथीलच सहायक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे.

स्वतंत्र चौकशी अधिकारी
या गुन्ह्याचा स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर निलंबित पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे याच्या चौकशीसाठी प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
उपअधीक्षक सरवदे सक्तीच्या रजेवर
या प्रकरणी जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे समजते. याबाबतचे अधिकार आपल्या क्षेत्रात नसल्याने त्याबाबत बोलण्यास पोलीस अधीक्षक मोहिते यांनी नकार दिला.

Web Title:  Police Constable, woman arrested with four accused: Shirom's tempo driver suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.