राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध नरसिंगराव, भरमूअण्णा

By admin | Published: January 20, 2017 01:20 AM2017-01-20T01:20:54+5:302017-01-20T01:20:54+5:30

चंदगडमधील लढतीचे संभाव्य चित्र : हालचाली गतिमान; दोन दिवसांत शिक्कामोर्तब

Nationalist, BJP vs Narasingrao, Bharamuanna | राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध नरसिंगराव, भरमूअण्णा

राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध नरसिंगराव, भरमूअण्णा

Next

समीर देशपांडे -- कोल्हापूर चंदगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुलाखती सुरू असतानाच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही आघाडी करण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले. त्यामुळे भरमूअण्णा पाटील आणि नरसिंगराव पाटील गट एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, दोनच दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
गेल्या वेळीही चंदगडमध्ये दोन्ही पाटील गट एकत्र आले होते. त्यामुळे कॉँग्रेसची सत्ता आल्यानंतर नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव महेश यांना शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद मिळाले; तर भरमूअण्णांच्या सूनबाई ज्योती यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळाले. भरमूअण्णा पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवायची आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे नरसिंगरावांचे चिरंजीव राजेश आणि महेश यांचे मामा गोपाळराव पाटील यांच्याशी पटू शकत नाही.
या पार्श्वभूमीवर पुढील अडचणी ओळखून कुपेकर वहिनींनी भाजपच्या गोपाळराव पाटील यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दौलत साखर कारखाना बंद पडल्याने अडचणीत आलेल्या गोपाळराव पाटील यांनी आधारासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तेथे भाजपची ताकद नसून गोपाळरावांचा गटच आता भाजपचा म्हणून ओळखला जात आहे. वेळेत आघाडी झाली नाही तर चंदगडमध्ये एकाकी पडण्याची भीती होती; म्हणून संध्यादेवी कुपेकर यांनी हालचाली करीत भाजपशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. येथे जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. त्यात सामंजस्याने जागावाटप होईल, असे सध्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, नरसिंगराव आणि भरमूअण्णा गट एकत्र येण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या दोन दिवसांत जागावाटपाबाबतचा तोडगा निघू शकेल. सध्या दोघांचेही चिरंजीव राजेश व दीपक ‘गोकुळ’मध्ये संचालक आहेत. नरसिंगरावांच्या निधनानंतर जिल्हा बॅँंकेची जागा रिक्त आहे. तेथे त्यांचे चिरंजीव राजेश इच्छुक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागा घेऊन ही युती होईल. याबाबत बुधवारी पाटणे फाटा, ता. चंदगड येथे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. या आघाड्यांबरोबरच शिवसेना, स्वाभिमानी यांच्याही भूमिकांविषयी उत्सुकता वाढली असून हे पक्ष स्वतंत्र लढणार की कुणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट होणार आहे.


चिन्ह कुठले घ्यायचे?
नरसिंगराव पाटील आणि भरमूअण्णा पाटील यांच्या दृष्टिक्षेपातील आघाडीमध्ये चिन्ह कुठले घ्यायचे यावर चर्चा सुरू आहे. भरमूअण्णांचा हातासाठी आग्रह असून राजेश पाटील मात्र आघाडी म्हणून लढू इच्छितात. वेळ पडल्यास जिल्हा बॅँकेच्या वेळी किंवा इतर कामावेळी हाताची अडचण येऊ नये. त्यापेक्षा आघाडी करून लढणे सोयीचे असल्याने त्यांचा तसा आग्रह आहे.
कार्यकर्त्यांंशी चर्चा करून आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल. अजून निर्णय झालेला नाही. तशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत.
- भरमूआण्णा पाटील

Web Title: Nationalist, BJP vs Narasingrao, Bharamuanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.