मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान

By संदीप आडनाईक | Published: February 23, 2023 05:28 PM2023-02-23T17:28:12+5:302023-02-23T17:29:08+5:30

शेतकऱ्यांना पुढे करुन मुश्रीफ यांनी येथे अनेक गैरव्यवहार केले

Mushrif misled farmers by giving false information, disclose within 48 hours; Challenge of Samarjit Ghatge | मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान

मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान

googlenewsNext

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. परंतु त्यांनी कर्ज घेतले आहे. खोटी माहिती त्यांनी सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, याचा ४८ तासात खुलासा करा, असे आव्हान भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.

समरजित घाटगे यांनी पत्रकारांपुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑडिट रिपोर्टमधील आणि नाबार्डच्या रिपोर्टमधील आकडेवारी पुढे ठेवली. या रिपोर्टनुसार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठा झाल्याचे सिध्द होते आहे.

२०१८-१९ मध्ये१५८.७० कोटी, नाबार्ड रिपोर्टनुसार २०१९-२० मध्ये १९५.३४ कोटी, २०२०-२१ मध्ये २२८.२९ कोटी आणि सरकारी ऑडिट रिपोर्टनुसार २०२१-२२ मध्ये २३२.७९ कोटी कर्ज घेतल्याची आकडेवारी समरजित यांनी दिली. अध्यक्षपदाचा गैरवापर करणाऱ्या मुश्रीफ यांनी बेकायदेशीरपणे हे कर्ज घेतले आहे. याचा ४८ तासात खुलासा करावा आणि त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी समरजित घाटगे यांनी केली आहे.

संताजी घोरपडे कारखाना शेतकऱ्यांचा नाही

सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा काही शेतकऱ्यांचा कारखाना नाही, तर त्यात हसन मुश्रीफ यांचेच नातेवाईक आणि मित्र परिवार आहे. ही घरच्या माणसांनाच घेउन स्थापन केलेली कंपनी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे करुन मुश्रीफ यांनी येथे अनेक गैरव्यवहार केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे नाव देण्यापेक्षा या कारखान्याला स्वत:ची हसन मुश्रीफ ॲन्ड लिमिटेड कंपनी असे नाव द्यावे, असेही आव्हान त्यांनी दिले. 

एकत्रितपणे पाठपुरावा 

ते म्हणाले, मी स्वत: चार्टड अकौंटंट आहे. त्यामुळे जिल्हा बँकेकडून पदाचा गैरवापर करुन त्यांनी केलेला गैरव्यवहार आकडेवारीतून मांडलेला आहे. याचा खुलासा तत्काळ करावा. अजूनही काही मुद्दे टप्प्याटप्याने मांडू असा इशारा समरजित यांनी दिला. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी दीड वर्षापूर्वी तक्रार दिली होती. माझ्याकडेही काही पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही दोघे एकत्रितपणे पाठपुरावा करत असल्याचे समरजित घाटगे म्हणाले.

Web Title: Mushrif misled farmers by giving false information, disclose within 48 hours; Challenge of Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.