शाळा समायोजनाबाबत ‘डाव्यां’कडून दिशाभूल: तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:00 AM2018-05-14T00:00:49+5:302018-05-14T00:00:49+5:30

Misleading by 'leftists' about school adjustment: Tawde | शाळा समायोजनाबाबत ‘डाव्यां’कडून दिशाभूल: तावडे

शाळा समायोजनाबाबत ‘डाव्यां’कडून दिशाभूल: तावडे

Next


कोल्हापूर : दहा पटसंख्येखालील शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू नये, असा त्यांचा डाव असून, तो सरकार हाणून पाडेल. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे दिले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिक्षणमंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अतिथिगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
तावडे म्हणाले, दहा पटसंख्येखालील शाळांमध्ये चार ते पाच विद्यार्थी असतात. या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, सहली, स्नेहसंमेलन होत नाही. अशा शाळांचे समायोजन केल्यास या सर्व उपक्रमांमध्ये तेथील विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. मात्र, त्याला जाणीवपूर्वक कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक विरोध करीत आहेत. त्यांनी खुल्या चर्चेसाठी बिंदू चौकात यावे. त्यांची भूमिका मांडावी. सरकारची भूमिका मी मांडेन. त्यातून खरे चित्र समोर येईल.
ते म्हणाले, राज्यातील १३०० पैकी ५४७ शाळांचे समायोजन सरकारने केले आहे. उर्वरित ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा मुद्दा असल्याने तेथील समायोजन केलेले नाही. मात्र, तरीही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारने १३०० शाळा बंद केल्याचे चुकीचे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाद्वारे १३ ओजस आणि शंभर तेजस शाळांची सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षांपासून केली जाणार आहे. आंतरविद्याशाखीय पदवीधर घडण्यासाठी क्लस्टर युनिव्हर्सिटीला मान्यता देण्याचे पाऊल सरकारने टाकले आहे. कलचाचणी अहवाल लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा.
दरम्यान, शिक्षणमंत्री तावडे यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जे. पवार, के. के. पाटील यांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. दि. १ व २ जुलैला पात्र शाळा व तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर यांनी शिक्षणमंत्री तावडे यांचा सत्कार केला. शिवाजी विद्यापीठ येथे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे उपाध्यक्ष संतोष आयरे यांनी निवेदन दिले.
एन. डी. पाटील यांची दिशाभूल
या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी शाळा समायोजनाबाबत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली आहे. समायोजनाबाबतची शासनाची भूमिका प्रा. पाटील यांना पटवून देण्याची माझी तयारी असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, शाळेला परवानगी देतानाही सरकारला शासकीय आदेश काढावा लागतो. त्यामुळे आदेशांची संख्या वाढलेली दिसते. धोरणात्मक असे केवळ ७८ शासकीय आदेश काढले आहेत.

Web Title: Misleading by 'leftists' about school adjustment: Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.