काढला जिल्हाध्यक्षपदाचा भार, मुश्रीफ-समरजित घाटगे संघर्ष; कागल विधानसभेचे रणांगण तापणार

By विश्वास पाटील | Published: July 23, 2023 12:38 PM2023-07-23T12:38:58+5:302023-07-23T12:41:30+5:30

कागल विधानसभा मतदार संघातून त्यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून ९० हजार मते घेतली आहेत.

Minister Hasan Mushrif-Samarjit Ghatge conflict; The battlefield of Kagal Assembly will heat up | काढला जिल्हाध्यक्षपदाचा भार, मुश्रीफ-समरजित घाटगे संघर्ष; कागल विधानसभेचे रणांगण तापणार

काढला जिल्हाध्यक्षपदाचा भार, मुश्रीफ-समरजित घाटगे संघर्ष; कागल विधानसभेचे रणांगण तापणार

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हाध्यक्षपदातून बाजूला करून समरजित घाटगे यांना भाजपने कागल विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मोकळे केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजपने कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा आणि शहरासाठी नवीन जिल्हाध्यक्ष दिल्याने घाटगे यांचे जिल्हाध्यक्षपद गेले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या निकषावर राज्यातील सर्वच पदाधिकारी बदलले आहेत.

कागल विधानसभा मतदार संघातून त्यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून ९० हजार मते घेतली आहेत. पराभव झाल्यापासून ते २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत आहेत. यावेळेला युतीतून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असताना, तोपर्यंत राष्ट्रवादी सत्तेत आल्याने मंत्री हसन मुश्रीफ कागलच्या उमेदवारीचे दावेदार म्हणून पुढे आले. कारण कोणतीही युती होताना विद्यमान लोकप्रतिनिधीलाच ती जागा सोडण्याचा संकेत असतो. त्यामुळे कागलची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता ठळक आहे. त्यामुळेच मुश्रीफ मंत्री झाल्यावर घाटगे नाराज झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कागलमध्ये येऊन विधानसभाच लढवणार असल्याचे जाहीर केले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडीत त्यांचे जिल्हाध्यक्षपदही गेले. त्यांना कुणाचाच विरोध नसल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून मुदतवाढ दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु तसे घडले नाही. ही जागा कुणालाही गेली तरी भाजपचे नेते म्हणूनच घाटगे कागलमधून विधानसभा लढवणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी जाहीरपणे सांगत आहेत. त्यासाठी सावंतवाडी मतदार संघाचे उदाहरण ते देत आहेत. गेल्या निवडणुकीत सावंतवाडीला शिवसेनेची उमेदवारी दीपक केसरकर यांना मिळाल्यावर त्यांच्याविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले राजन तेली अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि त्यांनी केसरकर यांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे महायुती झाली तरी भाजप या मतदार संघावरील हक्क सहजासहजी सोडणार नसल्याचेच ठळक होत आहे. त्यामुळे ही लढत आतापासूनच तापू लागली आहे.

पालकमंत्री नकोत..

हसन मुश्रीफ राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्याने त्यांचा कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचा कामाचा उरक, वेळ देण्याची सवय, प्रशासनावरील पकड प्रचंड आहे. त्यामुळे ते जर पालकमंत्री झाले तर इतर दोन्ही पक्षांना ते दाबणार अशी भीती भाजप व शिंदे गटालाही वाटू लागली आहे. त्यातूनच पालकमंत्रिपद मुश्रीफ यांना देऊ नये, अशी पत्रे भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून गोळा करण्याची मोहीम समरजित घाटगे यांच्याकडून सुरू असल्याचे समजते.

Web Title: Minister Hasan Mushrif-Samarjit Ghatge conflict; The battlefield of Kagal Assembly will heat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.