मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासनांचाच गाळ, ठोस काही नाही; महापूर रोखणे ठरणार हवेतल्या गप्पाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:39 PM2023-04-18T12:39:15+5:302023-04-18T12:39:41+5:30

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवर बैठक

Meeting at Sahyadri State Guest House on Development Works in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha Constituencies | मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासनांचाच गाळ, ठोस काही नाही; महापूर रोखणे ठरणार हवेतल्या गप्पाच 

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासनांचाच गाळ, ठोस काही नाही; महापूर रोखणे ठरणार हवेतल्या गप्पाच 

googlenewsNext

कोल्हापूर : पंचगंगा व कृष्णा नदीपात्रातील गाळ काढल्याने पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण होऊन पंचगंगा व कृष्णा नदी प्रवाहाचा मार्गही मोकळा होईल. त्यामुळे पुराची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे या पात्रातील गाळ काढण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. एप्रिल संपत आला आहे. जूनला पाऊस सुरू होतो. त्यामुळे निविदा काढून गाळ काढणे व महापूर रोखणे या हवेतल्या गप्पाच ठरण्याची स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत सगळ्या प्रश्नांबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकाही प्रश्नांबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

कोल्हापूर महापालिकेचा पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, इचलकरंजी महापालिकेच्या नवीन सभागृहासाठी आणि महापालिकेसाठी अंशदान तरतूद करण्यासही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवर सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, सुधीर गाडगीळ, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इचलकरंजी महापालिकेने सांडपाणी प्रक्रियेसाठी वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा. पाणी पुनर्वापराच्या प्रकल्पाचा विचार करावा. बायो टॉयलेटसारख्या अभिनव पर्यायांचाही शक्य तिथे अवलंब करावा. विशेषतः ज्या गावांमध्ये प्रक्रिया प्रकल्प शक्य नसेल, अशा गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा.

इचलकरंजीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव द्यावा. महापालिका सभागृहासाठी जागा व निधीचा प्रस्ताव सादर करा. न्यायालयाच्या इमारतीच्या भूखंडासाठी महापालिकेने नाहरकत दिली आहे. उर्वरित कार्यवाही लवकरात पूर्ण करा. माणगाव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या अस्पृश्य परिषदेचा शतकोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा. नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाबाबतही संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव सादर करावा.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

  • पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या ओपन एक्सेसमधील जाचक अटी रद्द करण्याबाबत धोरण निश्चित करणार.
  • कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तातडीने द्या.
  • प्रशासकीय संकुलासाठी शेंडा पार्कातील आरोग्य व कृषी विभागाची जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग द्या.
  • परीख पूल येथील राजारामपुरी आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसराला जोडणाऱ्या उड्डाण पुलाबाबतही पर्याय तपासून प्रकल्प आराखडा सादर करा.
  • वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी मंजूर.


आयआयटीकडून सर्वेक्षण

पंचगंगा प्रदूषणाखाली असलेल्या ८८ पैकी १९ गावांमध्ये आयआयटी मुंबई या संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केले आहे. त्याचे तांत्रिक सादरीकरण पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. उरलेल्या गावांच्या सर्वेक्षणाची वर्क ऑर्डर संस्थेला दिली असून या सर्व गावांमधून होणारे नदी प्रदूषण पूर्ण बंद करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 

Web Title: Meeting at Sahyadri State Guest House on Development Works in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha Constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.