पुजारी हटवण्याचा जिल्हा परिषदेत ठराव करा

By admin | Published: July 3, 2017 05:01 PM2017-07-03T17:01:56+5:302017-07-03T17:01:56+5:30

कोल्हापूरात संघर्ष समितीची जि.प. अध्यक्षांकडे मागणी

Make a resolution in the Zilla Parishad to delete the priest | पुजारी हटवण्याचा जिल्हा परिषदेत ठराव करा

पुजारी हटवण्याचा जिल्हा परिषदेत ठराव करा

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : श्री अंबाबाई मंदिरामध्ये सरकारी पुजारी नेमावेत, महालक्ष्मीऐवजी सर्वत्र अंबाबाई असा बदल करण्यात यावा यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा अशी मागणी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी भाजपचे गटनेते अरूण इंगवले आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.

दिलीप देसाई यांनी यावेळी निवेदनाचे वाचन केले. ९ जून २0१६ रोजी अंबाबाईला घागरा चोळी असा पोशाख घालण्यात आला. त्यामुळे भाविक संतप्त झाले. यापुढे कोणत्याही परिस्थितीत देवीला काठापदराची साडी परिधान करावी, नवरात्रामध्येही यात बदल होवू नये, पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी, शासन दरबारी सर्व कागदपत्रे, जाहीर निवेदने, फलकांवर, रेल्वेवर जिथे जिथे महालक्ष्मी असा उल्लेख आहे तेथे अंबाबाई असा उल्लेख व्हावा, राजर्षि शाहू महाराजांच्या आदेशाचा ‘तथाकथित’ म्हणून अवमान करणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांचा निषेध करावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

आम्ही सर्वजण आपल्या भावनांशी सहमत आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊन सर्वसाधारण सभेत ठराव करू अशी ग्वाही यावेळी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिली. माजी महापौर आर. के. पोवार यांनी हा विषय अजेंड्यावर घेण्याची विनंती केली. मात्र अजेंडा आधीच गेला असून आयत्यावेळच्या विषयामध्ये हा विषय घेऊ असे अरूण इंगवले यांनी स्पष्ट केले. गावसभांमधूनही असे ठराव करण्यासाठी जिल्हा परिषदेने आवाहन करावे अशी सुचना यावेळी करण्यात आली.

यावेळी बाबा पार्टे, सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील, सुरेश जरग, जयदीप शेळके, डॉ. जयश्री चव्हाण, सुनंदा चव्हाण, सुनिता पाटील, वैशाली महाडिक, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, सुधा सरनाईक, लता जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Make a resolution in the Zilla Parishad to delete the priest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.