तोतया अधिकाऱ्यांनी विक्रेत्यास लुटले

By Admin | Published: March 29, 2015 12:44 AM2015-03-29T00:44:39+5:302015-03-29T00:44:53+5:30

बारा लाखांचा ऐवज लंपास : महिलेस मारहाण; सातजणांची टोळी; दरोड्याचा गुन्हा

The looting officers robbed the vendors | तोतया अधिकाऱ्यांनी विक्रेत्यास लुटले

तोतया अधिकाऱ्यांनी विक्रेत्यास लुटले

googlenewsNext

मिरज : मिरजेतील विद्यानगर येथे अभिजित ऊर्फ आबा तातोबा जाधव या धान्य व रॉकेल विक्रेत्याच्या घरावर शुक्रवारी रात्री तोतया आयकर व पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे बारा लाखांचा ऐवज लुटला. जाधव यांच्या पत्नी सरिता यांना चोरट्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अज्ञात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉकेल व धान्य विक्री परवानाधारक जाधव यांचे विद्यानगर येथे दुकान व शेजारीच घर आहे. त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी रात्री जाधव कुटुंबीयांचे जेवण सुरू असताना लाल रंगाच्या जीपमधून सात ते आठजण घरात आले. त्यापैकी चौघांनी आपण कोल्हापूर विभागाचे आयकर अधिकारी असल्याची बतावणी केली. ‘आपल्यासोबत पोलीस असून तुम्ही कर्नाटक, कोल्हापूर व पंढरपुरात अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. आम्हाला तुमचे सर्व हिशेब तपासायचे आहेत’, असे तोतयांनी सांगितले. २५ ते ३० वयोगटातील तोतयांच्या गळ्यात आयकार्ड होते. अधिकाऱ्यांसारखा रूबाब असलेल्या भामट्यांना जाधव फसले. आयकर विभागाचा छापा पडल्याचे समजून ते गयावाया करू लागल्यानंतर भामट्यांनी त्यांना दम भरला. घराच्या सर्व दरवाजांना आतून कड्या लावून चोरट्यांनी जाधव दाम्पत्यासह मुलगा चिंग्या, राहुल, मुलगी अंकिता यांना एका ठिकाणी बसविले.
भामट्यांनी साहित्याची शोधाशोध करून कपाटातील साडेचार लाख रुपये रोख, ३० तोळ्यांचे दागिने काढून घेतले. कपाटाची किल्ली देण्यास नकार देणाऱ्या सरिता जाधव यांना त्यांच्यापैकी पोलीस म्हणून वावरणाऱ्या एकाने काठीने मारहाण केली. सरिता यांच्या अंगावरील सर्व दागिने व आबा जाधव यांच्या खिशातील पाच हजार रुपये, गळ्यातील चेन आणि मुलाच्या गळ्यातील चेन काढून घेण्यात आली. सरिता जाधव यांनी काही रोख रक्कम पलीकडे राहणारे दीर बापू ऊर्फ शिवाजी जाधव यांची असल्याचे सांगून दिराला हाक मारण्याचा प्रयत्न केला. त्या ओरडल्यानंतर एकाने त्यांचे केस धरून काठीने पायावर मारहाण केली. सरिता व त्यांच्या मुलाच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून दोन्ही मोबाईल चोरटे घेऊन गेले. घरातील सर्व मौल्यवान ऐवज गोळा केल्यानंतर चोरट्यांनी एका पिशवीत भरला.
‘आम्ही आता वरच्या मजल्यावर तपासणीसाठी जात आहोत, घरातून कोणीही बाहेर यायचे नाही,’ अशी तंबी देऊन चोरटे बाहेर गेले. जाधव यांच्या घराच्या सर्व दरवाजांना चोरट्यांनी बाहेरून कडी घातली. सर्व चोरटे दरवाजात थांबलेल्या एमएच ४३ असा क्रमांक असलेल्या वाहनातून पसार झाले. त्यानंतर जाधव दाम्पत्य शेजाऱ्यांकडून दरवाजाच्या कड्या काढून बाहेर आले. केवळ अर्ध्या तासातच घडलेल्या या नाट्यमय घटनेत चोरट्यांनी जाधव यांच्या घरातील बारा लाखांचा ऐवज लंपास केला.
घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, निरीक्षक शिवाजी आवटे व पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला. शहरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. चोरट्यांनी जाधव यांच्या पत्नी सरिता यांना मारहाण करून लुटल्याने पोलिसांनी सातजणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिल्मी स्टाईलने लूट
-‘स्पेशल २६’ या चित्रपटातील कथेप्रमाणे चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने जाधव कुटुंबीयांना लुटले. सर्व चोरटे मराठीत बोलत होते. अधिकाऱ्यांप्रमाणे आपसांत संभाषण करीत होते.
-‘वरिष्ठ अधिकारी गाडीत बसले आहेत. त्यांना बोलवू का,’ असे त्यांनी जाधव दाम्पत्याला विचारले.
-जाधव यांनी प्रकरण मिटविण्यासाठी विनवणी केल्यानंतर आमिष दाखवले, तर सर्वांना बेड्या ठोकू, असा दम भरल्याने जाधव यांचा रक्तदाब वाढला.
पूर्ण माहिती घेऊन डल्ला
-जाधव यांची पूर्ण माहिती असलेल्याने टीप देऊन चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरट्यांना जाधव यांच्या कुटुंबीयांची व घराची पूर्ण माहिती होती.
-जाधव यांचा मुलगा राहुल यास ‘तू चोरीचा लॅपटॉप घेतलेले प्रकरण मिटले का’, अशी चोरट्यांनी विचारणा केली. जाधव यांची मालमत्ता कोठे-कोठे आहे, याचीही चोरट्यांना माहिती होती.
-जाधव यांची पत्नी सरिता यांना दागिने इतरांना वापरण्यास देण्याची हौस असल्याने जाधव यांच्या श्रीमंतीची सर्वांना माहिती होती.
पोलीस यंत्रणा चक्रावली
-आबा जाधव यांनी उसाचे आलेले बिल बांधकाम खर्चासाठी घरात ठेवले होते. हे माहिती असणाऱ्या माहीतगारानेच डल्ला मारल्याचा संशय आहे. पोलिसांनी जाधव कुटुंबीयांची व त्यांच्या जवळच्या मित्रांची चौकशी सुरू केली आहे.
-आयकर अधिकारी व पोलीस असल्याचे भासवून मोठी रक्कम लुटण्याचा परिसरातील पहिलाच प्रकार असल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. चोरट्यांनी हाताचे ठसेही मागे ठेवलेले नाहीत. (वार्ताहर)
 

Web Title: The looting officers robbed the vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.