माणुसकीचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:07 AM2017-10-17T00:07:56+5:302017-10-17T00:07:56+5:30

Link to humanity | माणुसकीचा दुवा

माणुसकीचा दुवा

Next



कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून मदत गोळा करणाºया आणि गोळा झालेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविणाºया कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. ती आपल्याकडे कमी नाही. अनेक ग्रुप, संस्था, संघटना अशा प्रकारची कामे करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योग्य मदत मिळते आणि मनस्वी आनंदही मिळतो. हिंदू धर्मातील दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदात उपेक्षित, गोरगरिबांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला, आजही होताना पाहायला मिळतो.
दिवाळीला नवीन कपडे आणि खमंग फराळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात; परंतु ज्यांची ऐपत नाही असाही एक घटक समाजात आहे. अशा उपेक्षित, गोरगरिबांना दिवाळाची आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद देणाºयांकडून मिळाला तसा तो घेणाºयांकडूनही मिळाला. त्यामुळे ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू झाला, तो यशस्वी ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. आमदार सतेज पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमास एक लाखावर कपडे मिळाले, त्याचे वितरणही गरजूपर्यंत झाले. या उपक्रमाची दखल अन्य जिल्ह्यांत घेऊन तेथेही असे उपक्रम सुरू झाले आहेत हे या कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.
खरंतर अशाप्रकारचा उपक्रम गेल्या सात-आठ वर्षांपासून कोल्हापुरात सुरू आहे. जुने कपडे घेऊन ती बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमाकडे पाठविण्याचा उपक्रम महालक्ष्मी अ‍ॅपरल्सचे रवींद्र ओबेरॉय यांनी सुरू केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत होता. चांगल्या सुस्थितील इस्त्री केलेले कपडे दिवाळीत गोळा करून ओबेरॉय स्वत: ‘आनंदवन’ला जाऊन हे कपडे गरीब, पीडितांना देत असत. या उपक्रमाससुद्धा समाजाने भरपूर प्रतिसाद दिला, अनेकांनी कौतुकही केले.
कोल्हापूर शहरात एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘आपुलकीची दिवाळी’ या उपक्रमाची यंदापासून सुरुवात केली. गोरगरिबांना फराळ वाटण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची विवंचना आहे अशांना दिवाळीचे गोडधोड पदार्थ खायला मिळणे अवघडच. फराळ विकत घेऊन खाणे किंवा करून खाणं परवडणारे नाही. त्यांच्यासमोर ऐन दिवाळीत फराळासाठी भीक मागण्याची वेळ येत असते. या गोरगरिबांची गरज ओळखून आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू झाला. त्यालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्याच उपक्रमांना प्रसिद्धी मिळते असं काही नाही. जे वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोहोचतात, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते; परंतु समाजात असेही काही अवलिया आहेत की गोरगरिबांना एका हाताने केलेली मदत ही दुसºया हाताला कळता कामा नये, असे मानणाºयांपैकी आहेत. गरजूंना केलेल्या मदतीची ही मंडळी कधीही कुठेही वाच्यता करत नाहीत. अगदी नि:स्वार्थी वृत्तीने, कशाचीही अपेक्षा न ठेवता स्वकमाईतून मदत करत राहतात म्हणूनच त्यांचेसुद्धा सामाजिक काम कौतुकास्पद आहे. - भारत चव्हाण

Web Title: Link to humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.