मुख्याध्यापक संघात लाडच ‘दादा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:35 AM2017-12-25T00:35:05+5:302017-12-25T00:36:15+5:30

Ladach 'Dada' in the headmistress | मुख्याध्यापक संघात लाडच ‘दादा’

मुख्याध्यापक संघात लाडच ‘दादा’

Next


कोल्हापूर : संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत संघात ४९ वर्षांनंतर रविवारी सत्तांतर झाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू सत्तारूढ पॅनेलचे पानिपत करीत शिक्षक नेते दादा लाड, विलास साठे, बाबा पाटील, दत्ता पाटील आणि राजेंद्र रानमाळे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने २५ पैकी २२ जागांवर बाजी मारत संघाची सत्ता खेचून आणली. विद्यमान अध्यक्षांसह अकराजण पराभूत झाले.
मुख्याध्यापक संघाच्या स्थापनेपासून ४९ वर्षे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांची सत्ता कायम राहिली. गेल्या निवडणुकीत दत्ता पाटील, बाबा पाटील यांनी विरोध करत निवडणूक लढविली. यात त्यांचा निसटता पराभव झाला. यावेळेला दोन पाटील यांना दादा लाड, साठे आणि रानमाळे यांनी बळ दिल्याने निवडणुकीत कमालीची चुरस होती. एका-एका मतासाठी दोन्ही पॅनेलकडून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न झाले. मुख्याध्यापक संघाच्या कारभारावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. रविवारी सकाळी आठपासून शिवाजी पार्कमधील विद्याभवन या मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात मतदानास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत ७१० पैकी ६९७ जणांनी मतदान केले. यातील २५ मते अवैध ठरली. दुपारी चारनंतर मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्यांदा कार्यकारिणीच्या जागेची मोजणी झाली. पहिल्या फेरीपासून राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी मतांमध्ये पुढे राहिली, ती शेवटपर्यंत कायम राहिली. रात्री आठ वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया चालली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश संकपाळ यांनी ३५६ मतांसह बाजी मारली. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी चार उमेदवारांमध्ये लढत झाली. यात बाबासाहेब बुगडे (लोकशाही आघाडी) हे ३५६, तर डॉ. आनंद पाटील (सत्तारूढ पॅनेल) हे ३५१ मतांनी विजयी झाले. ‘लोकशाही आघाडी’च्या दत्तात्रय पाटील यांनी ३७८ मतांनी सचिवपदी, सुनील पसाले यांनी ३५४ मतांनी सहसचिवपदी, तर नंदकुमार गाडेकर यांनी ३६१ मतांसह खजानिसपदी विजय मिळविला. अन्य विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) : लोकशाही आघाडी : महंमद इरफान अखलाक अहमद अन्सारी (३४५), संजय भांदुगरे (३६०), सखाराम चौकेकर (३४७), संजय देवेकर (३५८), बबन इंदुलकर (३५८), संपत कळके (३५५), श्रीशैल मठपती (३७३), रवींद्र मोरे (३६८), जितेंद्र म्हैशाळे (३५६), अनिता नवाळे (३४९), गुलाब पाटील (३५९), जगन्नाथ पाटील (३७०), श्रीकांत पाटील (३५१), प्रकाश पोवार (३७१), अजित रणदिवे (३६२), प्रदीप शिंदे (३४४), सुरेश उगारे (३३९). सत्तारूढ पॅनेल : सुनंदा भागवत (३२२), भगवंत पाटील (३३७). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. सुधाकर शेरेकर यांनी काम पाहिले. दरम्यान, निकाल जाहीर होताच ‘विद्याभवन’ समोर राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीच्या समर्थक, विजयी उमेदवारांनी विजयाच्या घोषणा देत, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार जल्लोष केला.

सत्तारूढ पॅनेलमधील अन्य पराभूत
उमेदवार (कंसात मिळालेली मते) : नंदकुमार भोसले (३३१), अनिल देसाई (३२५), शांताराम गुरवे (३११), अर्जुन होनगेकर (३१५), खंडेराव जगदाळे (३३२), यल्लाप्पा कांबळे (३००), राजेंद्र खोराटे (३१२), बाळासाहेब मगदूम (३०७), पांडुरंग पाटील (३२२), सुरेश पाटील (३१३), श्रीरंग तांबे (२९६), संजय वास्कर (२७९).

शक्तिप्रदर्शन, जोरदार ईर्ष्या
शिवाजी पार्क येथील संघाच्या मुख्य कार्यालयात रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. येथे तीन बूथवर मतदान झाले. विक्रम हायस्कूल ते शाहूपुरी जिमखाना मैदानाच्या मार्गावर राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी आणि राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी यांनी बूथ लावले होते. त्यावर सत्तारूढ आणि विरोधी गटाचे उमेदवार, समर्थक थांबून होते. आपआपल्या आघाडीच्या नावांच्या टोप्या त्यांनी घातल्या होत्या. हलगी-घुमक्याच्या गजरात दोन्ही आघाड्यांकडून समर्थक, मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. प्रचार ते मतदानापर्यंत या आघाडींकडून शक्तिप्रदर्शन केले. जोरदार ईर्ष्या दिसून आली.


मतदाराच्या पाठबळामुळेच संघात ४९ वर्षांनंतर आम्हाला सत्ता बदल करण्यात यश मिळाले. या सत्तेचा आदर्श व्यासपीठ म्हणून उपयोग करणार आहे. एकहाती सत्ता मिळाल्याचा मोठा आनंद आहे. आमचे जे दोन उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल.
-दादा लाड, प्रमुख, राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी

मतदारांनी दिलेल्या कौलांचा आम्ही आदर करतो. पुन्हा जोमाने आम्ही काम करून मतदारांचा विश्वास संपादन करू.
- व्ही. जी. पोवार, सत्तारूढ पॅनेल.

Web Title: Ladach 'Dada' in the headmistress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.