कोल्हापूर : शिवाजी पेठेत चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी शंखध्वनी, ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 06:13 PM2018-02-15T18:13:38+5:302018-02-15T18:22:44+5:30

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गद्दारी केल्याबद्दल नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते बुवा चौकदरम्यान ‘गली गली मे शोर हैं, अजिंक्य चव्हाण चोर हैं’, ‘पैशांसाठी मत विकणाऱ्या गद्दार चव्हाणांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत जोरदार निदर्शनांसह शंखध्वनी केला.

Kolhapur: Shivaji Peth chanting slogans against Chavan, NCP activists held by police | कोल्हापूर : शिवाजी पेठेत चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी शंखध्वनी, ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 कोल्हापुरात शिवाजी पेठेतील वेताळमाळ परिसरातील नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या घरावर जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा बुवा चौकात पोलिसांनी अडविला. यावेळी कार्यकर्त्यांनी निदर्शने व शंखध्वनी केला. (छाया : आदित्य वेल्हाळ.)

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी पेठेत चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी शंखध्वनी ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गद्दारी केल्याबद्दल नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते बुवा चौकदरम्यान ‘गली गली मे शोर हैं, अजिंक्य चव्हाण चोर हैं’, ‘पैशांसाठी मत विकणाऱ्या गद्दार चव्हाणांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत जोरदार निदर्शनांसह शंखध्वनी केला.

या निदर्शनात शिवाजी पेठेतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमार अर्ध्या तासांच्या निदर्शनानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, चव्हाण यांच्या बाजूनेही वेताळमाळ परिसरात नगरसेवक, समर्थकांनी गर्दी केल्यामुळे काहीकाळ वातावरणात तणाव निर्माण झाला.

 मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अजिंक्य चव्हाण समर्थकांनी बुवा चौकात गर्दी केली होती; परंतु पोलिसांनी त्यांना तेथून बाजूला केले. (छाया : आदित्य वेल्हाळ.)

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गद्दारी केल्याबद्दल नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी पिरजादे यांच्या घरासमोर निदर्शने झाल्यानंतर गुरुवारी चव्हाण यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्वादीचे कार्यकर्ते उभा मारूती चौकात जमले.

सव्वा अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात पुरुषांबरोबरीने महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शिवाजी पेठेतील बुवा चौकात अडविण्यात आला. त्याठिकाणी जोरदार निदर्शने व शंखध्वनी करण्यात आला.

‘गद्दार नगरसेवक चव्हाण यांचा धिक्कार असो’, ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद अजिंक्य चव्हाण मुर्दाबाद’, ‘अजिंक्य चव्हाण कोण रे त्याला ७७७७ मारा दोन रे’, ‘पैशांसाठी जनतेची फसवणूक करणाऱ्या गद्दार नगरसेवकांचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी शिवाजी पेठेतील वातावरण दणाणून गेले. त्याचवेळी चव्हाण यांचे घर असलेल्या वेताळमाळ परिसरातही चव्हाण समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला.

स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक कमलाकर भोपळे, संतोष गायकवाड, किरण नकाते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, सुरेश जरग आदींनी चव्हाण यांच्या घरासमोर हजेरी लावली. जेव्हा मोर्चा बुवा चौकात पोहोचला तेव्हा चव्हाण समर्थकांना तेथून वेताळमाळ तालमीकडे जाण्याची पोलिसांनी सूचना केली.

शिवाजी पेठ सोडून जावे : राऊत

आम्ही नवरा-बायकोने प्रभागात चांगले काम केले. बुजुर्गांचे ऐकून आम्ही महापालिका निवडणुकीतून माघार घेतली. अजिंक्यला निवडून आणले; पण या पोरानं पैशांसाठी मत विकले. स्वाभीमानी शिवाजी पेठेचे नाव बदनाम केले. तुला दीड कोटी रुपये जर आयुष्यभर पुरणार असतील तर त्याने शिवाजी पेठ सोडून आता ताराबाई पार्कात राहायला जावे, अशा शब्दांत माजी नगरसेवक अजित राऊत यांनी निषेध केला. ‘आमचे आता त्याला आव्हान आहे की त्याने नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामारे जावे. त्याला आमची ताकद दाखवितो,’ असा इशाराही त्यांनी दिला.

चार माणसं जमणार नाहीत : कोराणे

रामभाऊदादांनी अजिंक्यसाठी अश्रू ढाळले. ‘शिवाजीरावचा पराभव झाला. आता त्याच्या पोराला निवडून आणून आमचं स्वप्न पूर्ण करा,’ अशी विनंती केली म्हणून अजिंक्यची उमेदवारी मान्य करून त्याला मदत केली. काचा बंद करून एसी गाडीतून फिरणाऱ्याला कोणी ओळखत नव्हते. या माणसाकडे चार कार्यकर्ते नव्हते तरीही त्याला निवडून आणले आणि आमच्याशीच गद्दारी केली, अशा शब्दांत उत्तम कोराणे यांनी समाचार घेतला.

मोर्चाचे नेतृत्व उपमहापौर सुनील पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, अमोल माने, अजित राऊत, उत्तम कोराणे, राजू जाधव, बंडा साळोखे, रमेश पोवार, अनिल कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, बाबा सरकवास, संजय कुराडे, संजय पडवळे, माजी नगरसेविका अर्चना कोराणे, जहिदा मुजावर आदींनी केले.
 

 

 

Web Title: Kolhapur: Shivaji Peth chanting slogans against Chavan, NCP activists held by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.