कोल्हापूर मनपातही ‘मल्टिस्टेट’ प्रकरणाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:25 AM2018-10-09T01:25:49+5:302018-10-09T01:27:59+5:30

Kolhapur Mantar also faces the 'multitait' issue | कोल्हापूर मनपातही ‘मल्टिस्टेट’ प्रकरणाचे पडसाद

कोल्हापूर मनपातही ‘मल्टिस्टेट’ प्रकरणाचे पडसाद

Next
ठळक मुद्देसत्तारूढ-विरोधकांतील वाद उफाळलाठेकेदाराने करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याचा त्यांचा दावा

शाहू जलतरण तलाव ठेकेदारावर कारवाईचे महापौरांचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या ‘मल्टिस्टेट’प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत असून, त्याचाच परिणाम म्हणून महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस आणि विरोधी असलेल्या भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील वाद नव्याने उफाळून आला आहे. शनिवारी भाजप-ताराराणी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाºयांनी अयोध्या पार्क येथील पार्किंगची जागा ठेकेदाराकडून काढून घेतल्यानंतर सोमवारी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शाहू जलतरण तलावासंबंधीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निमित्त शोधून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. महापालिकेतील हा वाद उफाळून आल्यामुळे अधिकाºयांची मात्र मोठी डोकेदुखी ठरली आहे.

महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष अलीकडे कमी होत असल्याचे दिसत होते. नगरसेवक अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा तर सत्तारूढ आणि विरोधक यांनी एकत्र येऊन लढा दिला. त्यातून दोघांमधील सत्तासंघर्ष कमी झाल्याचे जाणवले; परंतु गोकुळ दूध संघातील ‘मल्टीस्टेट’प्रस्तावावरून माजी आमदार महादेवराव महाडिक-पी. एन. पाटील तसेच आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्षाने भडका उडाला. मल्टीस्टेटचा गोंधळात प्रस्ताव मंजूर झाला असला तरी त्यावरून निर्माण झालेल्या भडक्याची धग काही कमी झालेली नाही. उलट त्याचे पडसाद अन्य संस्थांच्या राजकारणावर उमटत आहेत.
के.एम.टी. प्रशासनाची ५६ हजार चौरस फुटांची जागा अयोध्या पार्क येथे असून ती पे अँड पार्कसाठी भाड्याने दिली होती. या जागेचा वापर काही ठरावीक व्यावसायिक, व्यक्ती करत असल्याचा आरोप झाला होता; परंतु महापालिकेला ठरलेले भाडे मिळत असल्याने त्यांच्यावर काही कारवाई करता आली नाही.

गुरुवारी त्याचा ठेका संपला आणि शनिवारी स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, गटनेते सत्यजित कदम यांच्यासह काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्मचाºयांवर सक्ती करून ती जागा ताब्यात घेणे आणि महापालिकेतर्फे पार्किंग शुल्क वसूल करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्या ठिकाणी महापालिकेचा फलक लावला.
भाजप-ताराराणी आघाडीच्या पदाधिकाºयांनी ही कारवाई करण्यास भाग पाडले असता सोमवारी महापौर शोभा बोंद्रे, पक्षप्रतोद दिलीप पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, शिक्षण सभापती अशोक जाधव, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा यांच्यासह कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी टाकाळा येथील शाहू जलतरण तलाव येथे जाऊन पाहणी केली. हा जलतरण तलाव गळत असल्याने तो ठेकेदाराने बंद ठेवला आहे. मात्र, तेथे ठेकेदाराने फुटबॉलचे टर्फ मैदान तसेच वाढदिवस कार्यक्रमांना जागा उपलब्ध करून देऊन पैसे कमावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित पदाधिकाºयांनी जेव्हा या ठिकाणी अचानक भेट देऊन चौकशी केली असता फुटबॉलसाठी दुपारी तीन ते पाच यावेळेकरिता तासाला ५०० रुपये, तर सायंकाळी पाचनंतर तासाला एक हजार रुपये घेतले जातात, अशी माहिती मिळाली.

तलावावर एका कोपºयात दोन खोल्या असून तेथे वाढदिवस कार्यक्रमाचे भोजन बनवून दिले जाते. त्याकरिता तासाला पंधराशे रुपये घेतले जात असल्याचे कळाले.ठेकेदाराबरोबर झालेल्या करारातील अटींचा भंग झाल्यामुळे संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी, असा आदेश महापौर बोंद्रे यांनी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांना दिला. हा तलाव व्यावसायिक कारणाकरिता वापरायचा नाही असा करारात उल्लेख आहे; परंतु वीज बिल, देखभाल दुरुस्ती परवडत नाही म्हणून मूळ ठेकेदाराने पोटकुळ ठेवून तो अन्य कारणांसाठी वापरला जात असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

काय आहे वादाचे कारण?
अयोध्या पार्क येथील ५६ हजार चौरस फुटांची खुली जागा के. एम. टी. प्रशासनाने दिली होती. ही जागा सयाजी हॉटेलला लागून आहे. जागा उरुणकर अ‍ॅन्ड सन्स यांनी वार्षिक २५ लाख २५ हजार रुपये देकार देऊन भाड्याने घेतली; परंतु या जागेत अन्य खासगी वाहनांना प्रवेश न देता केवळ हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात होता; त्यासाठी ठेकेदाराने ही जागा बंदिस्त करून गेटदेखील बसविले होते, असा आरोप भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केला होता. ठेका संपल्यावर देखील याच हॉटेलच्या ग्राहकांकरिता जागा वापरली होती, असाही आरोप केला आहे.

शाहू जलतरण तलाव हा भीमा हेल्थ झोन नामक ठेकेदाराने घेतला असून, तो खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित असल्याचे कॉँग्रेस पदाधिकाºयांकडून सांगण्यात आले; त्यामुळे या तलावाचा सोमवारी पंचनामा करताना तेथे नेमके काय चालते, याची माहिती पदाधिकाºयांनी घेतली. सध्या बंद असलेल्या या तलावाच्या मोकळ्या जागेवर फुटबॉल टर्फ, वाढदिवस कार्यक्रमास जागा भाड्याने दिली जात असल्याचा पदाधिकाºयांचा आरोप आहे. ठेकेदाराने करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याचा त्यांचा दावा आहे.

जलतरण तलाव बंद स्थितीत
शाहू जलतरण तलाव ज्यांनी चालवायला घेतला आहे. त्यांनीच त्याची देखभाल करायची आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला गळती लागल्याने ती गळती काढून द्यावी म्हणून महापालिकेला संबंधित ठेकेदाराने कळविले आहे; परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या हा तलाव बंद ठेवला आहे. मागे महासभेत मुरलीधर जाधव यांनी या विषयाकडे लक्ष वेधून तातडीने तलाव दुरुस्ती करण्याची, निघालेल्या फरशा बदलण्याची सूचना केली होती, पण कार्यवाही न झाल्यामुळे जलतरणपटूंची गैरसोय होत आहे.

देशमुखांकडून घेतले १५०० रुपये
सोमवारी सायंकाळी सहा वाजता महापालिकेतील कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक जलतरण तलावावर गेले. त्यांनी फुटबॉल खेळण्यासाठी आलोय, असे संयोजकांना सांगितले तेव्हा तासाला पंधराशे रुपये पडतील असे सांगण्यात आले तेव्हा शारंगधर देशमुख यांनी १५०० रुपये काढून दिले. ही माहिती खुद्द देशमुख यांनीच पत्रकारांना दिली.

आघाड्यांचे राजकारण,अधिकाºयांची डोकेदुखी
महापालिकेतील आखाड्यांमधील राजकीय वाद उफाळून आला असताना तो अधिकाºयांची डोकेदुखी ठरली आहे. शनिवारी पार्किंग जागा ताब्यात घेतेवेळी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक यांना धारेवर धरले, तर सोमवारी कॉँग्रेस पदाधिकाºयांनी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांच्यावर ‘शाब्दिक’ हल्ला चढविला.

Web Title: Kolhapur Mantar also faces the 'multitait' issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.