कोल्हापूर ‘खड्डेमुक्त अभियान’चे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल: सदाशिव साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:36 PM2017-11-09T23:36:34+5:302017-11-09T23:45:33+5:30

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली.

 Kolhapur 'Khade Dukhi Abhiyan' will be completed before schedule: Sadashiv Salunkhe | कोल्हापूर ‘खड्डेमुक्त अभियान’चे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल: सदाशिव साळुंखे

कोल्हापूर ‘खड्डेमुक्त अभियान’चे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल: सदाशिव साळुंखे

Next
ठळक मुद्दे रोजच्या रोज फोटो व खड्डे भरलेली रस्त्याची साईज जीपीएस अ‍ॅपद्वारे जिल्हामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक अधिकाºयाने डोळ्यांसमोर ठेवले कोल्हापूर मंडळामार्फत कोल्हापूरसाठी तीन विभाग आणि सांगलीसाठी दोन विभागांतर्गत हे काम

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. दादांच्या घोषणेनंतर राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सुमारे १४०४ किलोमीटर राज्यमार्ग व १८६४ प्रमुख जिल्हामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचे ४७ टक्के, तर सांगली जिल्ह्यातील सुमारे ३२ टक्के खड्डे भरून झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (कोल्हापूर मंडळ) अधीक्षक अभियंता
सदाशिव साळुंखे यांच्याशी साधलेला थेट संवाद...


 प्रश्न : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर मंडळाचे खड्डेमुक्तीबाबत उद्दिष्ट किती?
उत्तर : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य आणि प्रमुख जिल्हामार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा १५ दिवसांपूर्वी केली. पावसामुळे सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यात राज्यमार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे तक्रारी वाढत होत्या. त्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व यंत्रणा कामाला लागली असून, इतर कामे सांभाळूनच मार्ग खड्डेमुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यानुसार नियोजनबद्ध काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १०६१.९३ राज्यमार्ग, तर १५०७.५६ किलोमीटर प्रमुख जिल्हामार्ग आहेत. त्यांपैकी सुमारे ६४४.६५ किलोमीटर राज्यमार्ग व ९४२.९३ किलोमीटर अंतर हे प्रमुख जिल्हामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक अधिकाºयाने डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यानुसार १५ डिसेंबरपूर्वी कोल्हापूर मंडळ आपले उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करील अशी अपेक्षा आहे.
 

प्रश्न : हे मार्गावरील खड्डे भरण्यासाठी प्रारंभ कधी करण्यात आला?
उत्तर : कोल्हापूर मंडळांतर्गत येणाºया सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतील राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांचे खड्डे भरण्याच्या कामाला प्रत्यक्षात आठवड्यापूर्वी प्रारंभ झाला. प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर हे खड्डे भरण्याची मोहीम सुरू केली जाते; पण यंदा पावसाळा उशिरापर्यंत सुरू राहिल्याने खड्डे भरण्याच्या मोहिमेस उशिरा प्रारंभ झाला. विशेषत: सांगली जिल्ह्यात पाऊस बराच काळ थांबून राहिल्यामुळे खड्डे डांबरीकरणाने भरताना मोठ्या अडचणी उद्भवू लागल्या; पण पाऊस थांबल्यानंतर या खड्डेमुक्त अभियानाला दोन्हीही जिल्ह्यांत प्रारंभ केला.
 

प्रश्न : कोल्हापूर मंडळाला रस्ते खड्डेमुक्त अभियानासाठी शासनाकडून किती निधी आला आहे?
उत्तर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर मंडळातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे १६ कोटी, तर सांगली जिल्ह्यासाठी १९ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे; पण हा निधी २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षांत खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या मंजूर निधीपैकी पन्नास टक्के निधी हा १५ डिसेंबरअखेर खड्डेमुक्त अभियानासाठी वापरण्यात येत आहे.
 

प्रश्न : खड्डे भरले का याची खात्री करण्यासाठी काय पद्धत आहे, त्यासाठी यंत्रणा किती?
उत्तर : मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खड्डेमुक्त अभियानाची घोषणा केल्यानंतर शासनाने ‘जीपीएस मोबाईल अ‍ॅप’ दिला आहे. त्यामध्ये रस्त्याचे नाव, खड्डा कोठे आहे, त्याचे अक्षांश व रेखांश, तसेच तो डांबरी खडीने भरल्यानंतर त्याचा फोटो काढून तो ठेकेदारामार्फत विभागीय मंडळाकडे पाठविला जातो. त्यानंतर खड्डा योग्य पद्धतीने भरल्याची खात्री झाल्यानंतर तोच फोटो पुन्हा थेट मंत्रालयात पाठविला जातो. असे रोजच्या रोज फोटो व खड्डे भरलेली रस्त्याची साईज जीपीएस अ‍ॅपद्वारे पाठविली जाते. यासाठी कोल्हापूर मंडळामार्फत कोल्हापूरसाठी तीन विभाग आणि सांगलीसाठी दोन विभागांतर्गत हे काम सुरू आहे.
 

प्रश्न : काम किती पूर्ण झाले?
उत्तर : यंत्रणा १५ डिसेंबर ही ‘डेडलाईन’ डोळ्यांसमोर ठेवून सक्रिय झाली असून, खड्डेमुक्त अभियानासाठी मी व्यक्तिगत पातळीवर रोज पाठपुरावा करत आहे. प्रारंभीच्या काळात थोडे संथगतीने काम सुरू होते. आता उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्यक्ष उपअभियंत्यांना दरदिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्याची त्याने ‘अ‍ॅप’द्वारे रोज माहिती देणे बंधनकारक आहे. आता हे खड्डे बुजविण्याचे काम गतीने सुरू असून, सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यमार्गावरील सुमारे ३०९ किलोमीटर, तर १९९ किलोमीटर प्रमुख जिल्हामार्ग पूर्ण करण्यात आले आहे, ते ४७ टक्के पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील राज्यमार्ग २४९ किलोमीटर, तर प्रमुख जिल्हा मार्ग७७ किलोमीटर खड्डे भरून पूर्ण केला आहे. त्यामुळे नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल. याची रोज ‘अपडेट’ माहिती मंत्रालयाला पाठविली जाते. यासाठी उपअभियंता, शाखा अभियंता, अभियांत्रिकी सहायक यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, त्यांना ही कामे प्राधान्याने करण्याचे आदेश दिले आहेत.
                                                                                                                                                                                       - तानाजी पोवार

Web Title:  Kolhapur 'Khade Dukhi Abhiyan' will be completed before schedule: Sadashiv Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.