ठळक मुद्देदुसरा दिवस; महाद्वारवरील फलक, इमारती, टाकीचे अडथळेआज, शुक्रवारी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत आली. अपेक्षेप्रमाणे किरणांची तीव्रता चांगली असली तरी काही अडथळ्यांमुळे किरणे वरपर्यंत पोहोचू शकली नाहीत. वातावरण असेच राहिले तर आज, शुक्रवारी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

तारखेनुसार किरणोत्सव गुरुवारपासून सुरू झाला असला तरी बुधवारीच किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला होता. त्यामुळे गुरुवारी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत जातील, अशी अपेक्षा होती. मावळतीला जाणाºया सूर्यकिरणांचा सायंकाळी ५ वाजून दोन मिनिटांनी महाद्वारातून सुरू झालेला प्रवास ५ वाजून ४६ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत आल्यानंतर थांबला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव यांच्यासह अंबाबाईच्या किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतील प्रा. पी. डी. राऊत, शाहीर राजू राऊत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा व प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.अंबाबाई मंदिरातून पाहिल्यानंतर महाद्वार रोडवरील काही दुकानांचे फलक, इमारती, पाण्याची टाकी, खांब असे काही अडथळे असल्याचे किरणोत्सवानंतर समितीतील सदस्यांना निदर्शनास आले. किरणोत्सव झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात आली.

एलईडी वॉलमुळे सर्वांचे समाधान
अंबाबाईचा किरणोत्सव सुरू असताना केवळ मंदिरात असलेल्या भाविकांनाच हा सोहळा पाहता येतो. मात्र, मंदिराबाहेरील हजारो भाविकांनाही याचा लाभ मिळावा यासाठी यंदा प्रथमच देवस्थान समितीच्या वतीने देवस्थान समितीच्या कार्यालयाशेजारी भव्य एलईडी वॉल लावण्यात आली होती. त्यामुळे मंदिराबाहेरील हजारो भक्तांनीही कोणतीही धक्काबुक्की न होता निवांत बसून हा सोहळा पाहिला व या सोईबद्दल समाधान व्यक्त केले.
निष्क्रिय महापालिका, देवस्थान समितीआज किरणोत्सवातील अडथळे हटविणार अंबाबाईच्या किरणोत्सवासाठी या मार्गातील अडथळे काढण्यासंबंधीचे पत्र व सूचना देवस्थान समितीच्या वतीने महापालिकेला देण्यात आली. त्याबाबत वारंवार आठवण करून देऊनही आजअखेर महापालिकेच्या अधिकाºयांनी संंबंधित इमारतींच्या मालकांना हे अडथळे हटविण्यासंबंधी सांगितले नाही वा तशी कारवाईही केली नाही. महापालिकेच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह, पदाधिकारी व कर्मचारी आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता किरणोत्सव मार्गातील अडथळे हटविण्याची मोहीम राबविणार आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.