जोतिबाची आज यात्रा; भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:18 AM2019-04-19T00:18:58+5:302019-04-19T00:19:03+5:30

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज, शुक्रवारी होत आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून, ...

Jotibaachi visit today; Enter the devotee | जोतिबाची आज यात्रा; भाविक दाखल

जोतिबाची आज यात्रा; भाविक दाखल

googlenewsNext

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज, शुक्रवारी होत आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून, जोतिबा डोंगरावर गुरुवारी रात्रीपर्यंत दोन लाख भाविक दाखल झाले आहेत.
चैत्र यात्रेचे मुख आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासन काठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ‘चांगभलं’च्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनांतून, चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल. पाच वाजता महाभिषेक, महापूजा होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल. जोतिबा डोंगरावरील सासनकाठ्यांची मिरवणूक मुख्य आकर्षण असते.
चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात.
दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यावेळेस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. या मिरवणुकीमध्ये क्रमाने पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतील. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी बारा वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल.
यात्रेवर निवडणुकीचा परिणाम
यंदा लोकसभा निवडणुकीचा परिणाम यात्रेच्या गर्दीवर जाणवत आहे. गुरुवारी दुसºया टप्प्यातील मतदान असल्याने गतवर्षीपेक्षा भाविकांची गर्दी यंदा कमी पाहायला मिळाली. मतदान करून येणाºया भाविकांमुळे गुरुवारी रात्रीपासून गर्दी वाढली जाणार आहे.

Web Title: Jotibaachi visit today; Enter the devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.