कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Published: December 4, 2023 06:31 PM2023-12-04T18:31:16+5:302023-12-04T18:31:49+5:30

पाच टक्के परताव्याचे आमिष, व्याज अन् मुद्दलही अडकली

Investors cheated of crores by share trading company in Kolhapur, Crime against six suspects | कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांची एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत संजय सॅलो कास्टो (वय ५७, रा. हल्याळ, जि. कारवार, कर्नाटक) यांनी रविवारी (दि. ३) रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरेक्स वेल्थ सोल्युशन कंपनीसह सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फॉरेक्स वेल्थ सोल्युशन (स्वानंद कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यासह कंपनीचे संचालक स्वप्नील गजानन माताडे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), सोनिया विश्वनाथ हत्ते (रा. कुपवाड रोड, सांगली), दीपक शिवाजी गजाकोश (रा. आरके नगर, कोल्हापूर), प्रसाद परशराम सोनके (रा. साधना कॉलनी, गडहिंग्लज) आणि गंगाराम पितांबर दंडी (वय ५०, रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कास्टो आणि त्यांच्या नातेवाइकांनी १३ मे २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ सोल्युशन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवले. गुंतवलेल्या रकमेवर दरमहा पाच टक्के परतावा आणि पाच टक्के मुद्दल अशी दहा टक्के रक्कम देण्याचा करार कंपनीने गुंतवणूकदारांसोबत केला होता. सुरुवातीचे काही महिने परतावे मिळाल्यामुळे कास्टो यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी बँकांमधून कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून काढलेले पैसे फॉरेक्समध्ये गुंतवले.

मात्र, गेल्या वर्षभरापासून परतावे मिळणे बंद झाले. मुद्दलही परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तक्रार अर्जाची पडताळणी करून फॉरेक्स कंपनीसह सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Investors cheated of crores by share trading company in Kolhapur, Crime against six suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.