सांगलीतील कोथळे खून प्रकरणचा तपास कोल्हापूर सीआयडी विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 06:16 PM2017-11-09T18:16:11+5:302017-11-09T18:21:52+5:30

सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाचजणांना बडतर्फ करण्यात येईल. याबाबतची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापुरात गुरुवारी पत्रकारांना दिली.

The investigations into the murder case of Sangli's Kothale murder case was registered by the Kolhapur CID Department | सांगलीतील कोथळे खून प्रकरणचा तपास कोल्हापूर सीआयडी विभागाकडे

सांगलीतील कोथळे खून प्रकरणचा तपास कोल्हापूर सीआयडी विभागाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देनिलंबित युवराज कामटेसह पाच पोलिसांना बडतर्फ करणार : नांगरे-पाटीलयुवराज कामटे वादग्रस्तच...कोणाला पाठीशी नाही, सखोल तपास : नांगरे -पाटीलकोथळे चहा कंपनीत कामास...

कोल्हापूर ,दि. ९ : सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाचजणांना बडतर्फ करण्यात येईल. याबाबतची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापुरात गुरुवारी पत्रकारांना दिली.


या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी), कोल्हापूर विभागाकडे देण्यात आला आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलीस सीआयडीला सर्वतोपरी मदत करतील, असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

मृत अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार संशयित अमोल भंडारेने चाकूचा धाक दाखवून कवलापुरातील अभियंत्याची लूटमार केली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तपासावेळी पोलीस मारहाणीत कोथळेचा मृत्यू झाला. हा गुन्हा लपविण्यासाठी संशयित युवराज कामटेसह पोलिसांनी आरोपी पळून गेल्याचा बनाव केला होता. मात्र, तपासाअंती कोथळेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.  या प्रकरणी कामटेसह पाच पोलिसांना सांगली पोलिसांनी अटक केली. त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.


या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी गुरुवारी नांगरे-पाटील यांची कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


नांगरे-पाटील म्हणाले, सांगली पोलिसांकडून झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसिरुद्दीन मुल्ला व राहुल शिंगटे हे पाचजण निलंबित आहेत. मात्र, भारतीय राज्यघटनेच्या ३११ कलमानुसार पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार मला आहे; तर पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षकांना आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन व तपास करून बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाईल.


आंबोलीमध्ये अनिकेत कोथळे याचा मृतदेह ८० टक्के जळून खाक झाला आहे. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांना बोलाविले आहे. हा पंचनामा सिंधुदुर्ग येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दर्जाचे न्यायाधीश तसेच पोलीस उपअधीक्षक यांच्यासमोर करण्यात आला आहे.

हा संपूर्ण तपास हा राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी याचा तपास करणार आहेत. त्यासाठी लागेल ती मदत कोल्हापूर पोलीस देतील.


युवराज कामटे वादग्रस्तच...

युवराज कामटे हा पूर्वी कोल्हापूर पोलीस दलात कॉन्स्टेबल होता. त्यानंतर तो पोलीस उपनिरीक्षक झाला. मुंबईत सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तो सांगली पोलीस दलात आला. त्याच्या वर्तणुकीमुळे सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी त्याची एक पगारवाढ रोखली होती. एकंदरीत, कामटेची कारकिर्द वादग्रस्तच होती, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी यावेळी दिली.

कोणाला पाठीशी नाही, सखोल तपास : नांगरे -पाटील

सोमवारी (दि. ६) अनिकेत कोथळे व अमोल भंंडारे या दोघांना अटक केली होती. त्यामुळे सांगली शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी पोलीस ठाण्यास रात्री भेट दिली. यावेळी काळे यांनी, पोलीस कोठडीत किती आरोपी आहेत, अशी विचारणा ठाणे अंमलदाराकडे केली असता त्याने संदिग्ध माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणाची कुणकुण काळेंना लागली. या घटनेवेळी पोलीस ठाण्यात कोणी बघ्याची भूमिका घेतली. तेथे कोण-कोण उपस्थित होते, या दृष्टीने सखोल तपास करणार आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोथळे चहा कंपनीत कामास...

अनिकेत कोथळे हा चहा कंपनीत कामास होता. त्याच्याबद्दल तक्रार होती म्हणून काही दिवसांपूर्वी सांगली शहर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी आणले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. त्याचा हा लूटमारीचा पहिलाच गुन्हा होता. त्या दृष्टीने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
 

 

Web Title: The investigations into the murder case of Sangli's Kothale murder case was registered by the Kolhapur CID Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.