हाळवणकरांची हॅट्ट्रिकसाठी, आवाडेंची अस्तित्वासाठी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:59 AM2019-07-22T00:59:33+5:302019-07-22T00:59:37+5:30

अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात या वेळीही आजी-माजी आमदारांतच निकराची लढाई होणार आहे. ...

Halvankar's fight for the hatcheck, the existence of the voice | हाळवणकरांची हॅट्ट्रिकसाठी, आवाडेंची अस्तित्वासाठी झुंज

हाळवणकरांची हॅट्ट्रिकसाठी, आवाडेंची अस्तित्वासाठी झुंज

googlenewsNext

अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात या वेळीही आजी-माजी आमदारांतच निकराची लढाई होणार आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी हॅट्ट्रिकसाठी मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत बूथ लेवल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आपण केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी ते जोर लावत आहेत, तर आवाडे यांनी अस्तित्वाची लढाई म्हणून सर्वतोपरी हालचाली सुरू केल्या आहेत. मतदारसंघाचा मुख्य गाभा असलेल्या वस्त्रोद्योगाची मोडकळीस आलेली अवस्था व त्याला कारणीभूत भाजप सरकार आणि लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत त्यावर जोर देत बाजी मारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अवघ्या सहा किलोमीटरच्या परिघात असलेला जिल्ह्यातील सर्वांत लहान मतदारसंघ म्हणून इचलकरंजी मतदारसंघाची ओळख आहे. अपवाद वगळता सुरुवातीपासून या मतदारसंघावर कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. सन २००९ साली पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलले. त्यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवक असलेल्या सुरेश हाळवणकर यांना आमदारपदाची लॉटरी लागली. मिळालेल्या या संधीचे सोने करत हाळवणकर यांनी विरोधी आमदार असतानाही अतिशय शिस्तबद्धरीत्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणले. लेखाजोखासारखे उपक्रम राबवत केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली.
त्यानंतर सन २०१४ साली हाळवणकर यांनी मतदारसंघात केलेली कामे व आवाडे यांच्याकडून निवडणुकीपूर्वी व्यक्तिगत त्रास देत असल्याची वातावरणनिर्मिती, त्यामुळे निर्माण झालेले आवाडेविरोधी वातावरण याचा पुरेपूर फायदा घेत मोदी लाटेवर स्वार होऊन दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यामुळे आवाडे यांच्यासह कॉँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी पीछेहाट झाली. दोनवेळा आमदारकीसह नगरपालिका व ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये हाळवणकर यांनी बाजी मारली.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून विणलेले जाळे, त्यातून जोडले गेलेले परिवार, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी या जोरावर अनेकवेळा या मतदारसंघावर अधिराज्य गाजवले. मात्र, सन २००९ पासून त्यांना लागोपाठ पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातूनही न डगमगता त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर राहत वेळोवेळी अनेक प्रश्नांवर मोठमोठी आंदोलने करून वाचा फोडण्याचे काम केले. त्याचे फलित म्हणून त्यांचा पूर्वाश्रमीचा मतदारसंघ असलेल्या नदीपलीकडील गावांमध्ये आपले जुने संबंध कार्यान्वित करत जिल्हा परिषदेला पुत्र राहुल यांना निवडून आणले. त्यामुळे आवाडे गटाला नवचैतन्य मिळाले. कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. वस्त्रोद्योगात निर्माण झालेल्या अडचणींवर आंदोलने उभी करत सरकारला धारेवर धरले. तसेच वस्त्रोद्योगाची अवस्था, नगरपालिकेतील कारभार, आयजीएम रुग्णालयाची दुरवस्था या मुद्द्यांवर हाळवणकर यांच्यावर अपयशाचा आरोप करीत त्यांना घरेले आहे. .
आमदार हाळवणकर यांच्याकडून दहा वर्षे मतदारसंघात झालेली विकासकामे, प्रमुख रस्त्यांसाठी खेचून आणलेला कोट्यवधीचा अतिरिक्त निधी, विविध योजनांच्या माध्यमातून झालेली जनतेची कामे, चार वर्षात मतदारसंघासाठी ३२७ कोटींचा आणलेला निधी, वस्त्रोद्योगासाठी सूतगिरणी, सायझिंग व यंत्रमागधारकांना सवलत योजना अशा कामांतून जनतेपर्यंत पोहचण्याचे काम सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी हाळवणकर यांनी इचलकरंजी मतदारसंघातील आपली यंत्रणा पूर्णपणे सक्रिय करून त्या माध्यमातून कॅम्पेनिंग करत तळागाळापर्यंत पोहचून माने यांच्या विजयात सिंहाचा वाटा मिळवून दिला. रंगीत तालीम यशस्वी झाल्याने हाळवणकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, विधानसभेला हॅट्ट्रिक करण्यासाठी जोमाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

हॅट्ट्रिक की बाजी याकडे लक्ष
या मतदारसंघात कॉँग्रेसचे वर्चस्व असल्याने कल्लाप्पाण्णा आवाडे सन १९८० ची निवडणूक जिंकून आमदार झाले. त्यानंतर दोनवेळा खासदार झाले. तसेच मंत्रिपदापर्यंतही मजल मारली. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे हे सन १९८५ ला आमदार झाले. त्यानंतर सन १९९० ला एकवेळ कॉम्रेड के. एल. मलाबादे आमदार झाले. त्यांच्यानंतर सन १९९५, १९९९ व २००४ असे सलग तीन वेळा आमदार बनून प्रकाश आवाडे यांनी हॅट्ट्रिक केली. त्यातील एकवेळ मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यानंतर सन २००९ व २०१४ अशी सलग दोनवेळा हाळवणकर यांनी आमदारकी जिंकली. यंदा त्यांना हॅट्ट्रिकची संधी आली आहे. त्यामुळे ते हॅट्ट्रिक मारतात की आवाडे कॉँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आवाडे यांच्या जमेच्या बाजू
मतदारसंघात विविध सहकारी संस्थांचे विणलेले मोठे जाळे, सामाजिक संस्था, त्यासोबत जोडलेले परिवार, निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी, वस्त्रोद्योगाच्या विकासाची दूरदृष्टी, विविध योजना व त्या माध्यमातून निधी खेचून आणण्याचा हातखंडा, आवाडे-आवळे यांचे झालेले मनोमिलन, माजी खासदार राजू शेट्टी यांची साथ.
हाळवणकरांच्या जमेच्या बाजू
सलग दोनवेळा आमदार झाल्याने केलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे, नगरपालिकेतील सत्ता, ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतींमध्ये असलेले वर्चस्व, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचे व त्यांच्या गटाचे पाठबळ.

Web Title: Halvankar's fight for the hatcheck, the existence of the voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.