लोकसहभागातून ‘संगणक शिक्षणाची गुढी’ : गडहिंग्लज नगरपालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:19 AM2018-03-20T00:19:56+5:302018-03-20T00:19:56+5:30

 Gudhi of 'Computer Education' from the people's participation: Gadhingjaj municipal activities | लोकसहभागातून ‘संगणक शिक्षणाची गुढी’ : गडहिंग्लज नगरपालिकेचा उपक्रम

लोकसहभागातून ‘संगणक शिक्षणाची गुढी’ : गडहिंग्लज नगरपालिकेचा उपक्रम

Next

राम मगदूम।
गडहिंग्लज : गोरगरीब मुलांनाही संगणक हाताळायला मिळावे, त्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी येथील नगरपालिकेने संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील या प्रयोगशाळेत पालिकेच्या अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. लोकसहभागातील या उपक्रमाद्वारे गडहिंग्लज पालिकेने ‘संगणक शिक्षणाची गुढी’ उभी केली आहे.

१९७८ मध्ये गडहिंग्लज नगरपालिका शिक्षण मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या गडहिंग्लज शहरातील सर्व प्राथमिक शाळा पालिकेकडे हस्तांतरित झाल्या. सध्या एका उर्दू शाळेसह सहा शाळा पालिकेतर्फे चालविल्या जातात, तर सहा अनुदानित खासगी शाळांवर शिक्षण मंडळाचे नियंत्रण आहे.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी येथील पालिकेच्या शाळा सुरुवातीपासूनच प्रसिद्ध आहेत. नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य-पुस्तके, दप्तर, गणवेश, बूट, आदी साहित्य मोफत पुरविले जाते. तथापि, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि खासगी शाळांच्या स्पर्धेमुळे पालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. त्यामुळेच शहरातील गरीब मुलांच्या शिक्षणाचा आधार असणाऱ्या या शाळा टिकाव्यात, बहराव्यात यासाठी नगरपालिका धडपडत आहे.

नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी लोकसहभागातून पालिकेच्या सर्व शाळेत डिजिटल वर्गांची सोय आणि मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने गडहिंग्लज सायन्स सेंटर (विज्ञान प्रयोगशाळा) सुरू केली आहे. त्यापाठोपाठ संगणक प्रयोगशाळा सुरू करून त्यांनी पालिकेच्या शाळा सक्षम करण्याचे कृतिशील पाऊल पुढे टाकले आहे.

माजी विद्यार्थिनीकडून मोफत धडे
स्व. बंडोपंत तथा पिंटू बाळासाहेब मोरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या संगणक कक्षात तब्बल १२ संगणक उपलब्ध आहेत. या शाळेसह नगरपालिकेच्या अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीही संगणक प्रशिक्षणाचे खास वेळापत्रक तयार केले आहे. येत्या जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. संगणकशास्त्राची पदवी प्राप्त माजी विद्यार्थिनी प्रीती शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिकविण्याची जबाबदारी घेतली आहे.

 

गुढीपाडव्यानिमित्त आमच्या शाळेतील पहिलीच्या वर्गात तब्बल २१ मुलांनी प्रवेश घेतला. यापूर्वी केवळ दोन-चार विद्यार्थीच प्रवेश घेत. मात्र, डिजिटल क्लासरूम व कॉम्प्युटर लॅबची सोय झाल्याने पहिलीच्या प्रवेशाला यावर्षी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- विठ्ठल देसाई, मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यालय, गडहिंग्लज.

Web Title:  Gudhi of 'Computer Education' from the people's participation: Gadhingjaj municipal activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.