ग्रामपंचायत ते संसद : धैर्यशील माने यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:08 PM2019-05-25T12:08:42+5:302019-05-25T12:12:20+5:30

स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या पावलावर पाऊल ठेवत धैर्यशील माने हे ग्रामपंचायतीचे सदस्य ते व्हाया जिल्हा परिषदमार्गे संसदेत पोहोचले आहेत.

Gram panchayat to Parliament: The journey of Dhairyashil Mane | ग्रामपंचायत ते संसद : धैर्यशील माने यांचा प्रवास

ग्रामपंचायत ते संसद : धैर्यशील माने यांचा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थेचे कामच उपयोगी पडेल

राजाराम लोंढे

कोल्हापूर : स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या पावलावर पाऊल ठेवत धैर्यशील माने हे ग्रामपंचायतीचे सदस्य ते व्हाया जिल्हा परिषदमार्गे संसदेत पोहोचले आहेत. घरात लहानपणापासूनच त्यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव त्यांच्या पुढील वाटचालीत उपयोगी पडणार हे निश्चित आहे.

इचलकरंजी व हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर स्वर्गीय बाळासाहेब माने यांचाच वरचष्मा राहिला. स्वर्गीय माने यांनीही ग्रामपंचायत व्हाया जिल्हा परिषदमार्गे संसदेत प्रवेश केला. त्यांनी रूकडी गावचे सरपंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. येथील अनुभव कामाच्या बळावरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष म्हणून अधिक आक्रमक कामाची चुणूक दाखवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन बाळासाहेब माने संसदेत पोहोचले. तब्बल पाचवेळा ते इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले. रूकडी गावचे सरपंच ते उत्कृष्ट संसदपटू हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच धैर्यशील माने यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू ठेवली. लहानपणापासून धैर्यशील माने यांच्या सोबत राहिले. त्यांच्या प्रत्येक राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमात नेहमीच सोबत राहिले. त्यावेळेपासूनच धैर्यशील यांना राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळत गेले. बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर माने कुटुंबाला सावरत निवेदिता माने यांनी माने गटाची धुरा सांभाळली. त्यांनी १९९६ ला अपक्ष, तर १९९८ ला शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली; पण त्यांना यश आले नाही. १९९९ राष्टÑवादीची उमेदवारी घेत त्या तिसऱ्या प्रयत्नात संसदेत पोहोचल्या.

यामध्ये धैर्यशील माने यांचा सक्रिय सहभाग राहिला. या निवडणुकीच्या माध्यमातून धैर्यशील यांनी मतदारसंघाचा अभ्यास करत स्वत:चा ठसा उमटविण्यास सुरुवात केली; पण राजकीय जीवनाची पंचायत समिती, जिल्हा परिषद की ग्रामपंचायतीपासून करायची, याबाबत संदिग्धता होती. अखेर बाळासाहेब माने यांच्याप्रमाणे ग्रामपंचायतीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २००२ च्या रूकडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक २ मधून मोठ्या फरकाने विजयी झाले.

अभ्यासूवृत्ती, आक्रमक वक्तृत्त्व व तरुणांमधील क्रेझ, यामुळे धैर्यशील यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले. ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतानाच २००७ ला शिरोळ तालुक्यातील ‘आलास’मूधन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून यश संपादन केले. या कालावधीत अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अतिशय नेटाने काम केले. त्यानंतर २०१२ ला हातकणंगले तालुक्यातील ‘पट्टणकोडोली’ मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत पोहोचले; पण येथे कॉँग्रेस-राष्टÑवादीला बाजूला करत सत्ता स्थापन केल्याने माने यांच्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पडली. ही जबाबदारीही अतिशय प्रभावीपणे पार पाडत, जिल्हा परिषदेचे सभागृह पाच वर्षे गाजविले. आक्रमक वक्तृत्वशैली, अभ्यासू मांडणीमुळे सत्ताधाºयांना धडकी भरत होती.

जिल्हा परिषदेचा हा टर्म संपल्यानंतर पत्नी वेदांतिकांना रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून रिंगणात उतरवले; पण यामध्ये त्यांचा पराभव झाला. हा पराभव माने गटाच्या दृष्टीने जिव्हारी लागणारा होता. २००९च्या लोकसभा निवडणुकीतील निवेदिता माने यांच्या पराभवानंतर माने गटाला हळूहळू गळती लागली होती. वेदांतिका यांच्या पराभवानंतर माने गटाच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भाजप, शिवसेनेचा वाढता प्रभाव आणि राष्टÑवादीमध्ये केली जाणारी जाणीवपूर्वक कुचंबणा केल्याने ते काहीसे अस्वस्थ होते. लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी सात-आठ महिन्यांपूर्वीच केली होती.

वेळ आल्यानंतर झेंड्याचा रंग ठरविला जाईल, असे सांगत त्यांनी तयारी सुरू केली. त्यात राजू शेट्टी यांनी महायुतीतून बाहेर पडत दोन्ही कॉँग्रेसशी घरोबा केल्याने ‘हातकणंगले’ची जागा आघाडी धर्मात शेट्टी यांनाच जाणार, हे माने यांना माहिती होते; त्यामुळे राष्टÑवादीतून बाहेर पडायचे, पण कोणत्या पक्षात जायचे याबाबत ते संभ्रमावस्थेत होते. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे तीन व भाजपचे दोन आमदार आहेत. ‘कोल्हापूर’च्या तुलनेत येथे युतीची ताकद मोठी आहे. अखेर डिसेंबरमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजू शेट्टीसारख्या तगड्या उमेदवाराशी झुंज देणे तितकेसे सोपे नव्हते; पण अतिशय नियोजनरीत्या प्रचारयंत्रणा राबत, त्यांनी शेट्टी यांच्यावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळली. सकारात्मक पण तितकाच आक्रमक प्रचार राबवित त्यांनी जनतेत विश्वास निर्माण करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

जातीयतेच्या किनाºयाचा इतिहास
इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघाला जातीयतेची किनार नवीन नाही. बाळासाहेब माने व रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यापासून येथे ही बीजे पेरली होती. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत कमी-अधिक प्रमाणात हा मुद्दा डोके वर काढायचा, पण या वेळेला धार अधिकच आली.

बाळासाहेब माने यांची आठवण
प्रचाराच्या महिना-दीड महिन्यात धैर्यशील यांनी वक्तृत्वाने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या भाषणाची शैली पाहून जुन्या-जाणत्या लोकांना स्वर्गीय बाळासाहेब माने यांची आठवण व्हायची. त्याचा फायदाही विजयापर्यंत नेण्यात झाला.

धैर्यशील माने यांचा प्रवास :
२००२-सदस्य, रूकडी ग्रामपंचायत
२००७-सदस्य आलास जिल्हा परिषद मतदारसंघ (अडीच वर्षे उपाध्यक्ष)
२०१२-सदस्य पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ (पाच वर्षे विरोधी पक्षनेता)
२०१९-सदस्य लोकसभा


धैर्यशील माने
शिक्षण : पदवीधर
जन्मदिनांक : २३ डिसेंबर १९८१
पत्नी : वेदांतिका
आई : निवेदिता माने (माजी खासदार)
माजी उपाध्यक्ष : जिल्हा परिषद कोल्हापूर

 

Web Title: Gram panchayat to Parliament: The journey of Dhairyashil Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.