In the forest, there are tigers, herb, clusters, fox, Kolhapur, Satara, Karhad and Miraj railway stations. | जंगलातले वाघ, हरण,काळवीट,कोल्हा दिसताहेत कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड,मिरज रेल्वेस्थानकांत

ठळक मुद्देसह्याद्री व्याघ्र प्रकल्प : वन्यजीव कोल्हापूर विभागाचा हा अनोखा प्रकल्प ठरतोय लक्षवेधी

शेखर धोंगडे।
कोल्हापूर : सह्याद्रीच्या खोऱ्यात राहणारे वन्यजीव आता पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर दिसू लागले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव कोल्हापूर यांच्या विशेष संकल्पनेतून ते सत्यात उतरले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड व मिरज येथील रेल्वेस्थानकांत हे जंगली वन्यजीव, विविध प्रकारचे सरपटणारे साप, नाग व फुलपाखरू आकर्षक लक्षवेधी चित्रातून पाहण्याची संधी लहान मुलांसह पर्यटक व कुटुंबीयांना मिळत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. असंख्य वैविध्यपूर्ण प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य तिथे आहे. प्रत्यक्षात किंवा चित्रफीत तसेच चित्ररूपातून त्याचे दर्शन आजच्या पिढीला घडत असते; पण याची अधिक सविस्तर माहिती सर्वस्तरातील लोकांना, मुलांना, कुटुंबीयांना व पर्यटकांना मिळावी या उद्देशानेच पुण्याच्या धर्तीवर सातारा, कऱ्हाड, मिरज येथे हा प्रकल्प पूर्णत्वाला नेला असून, आता कोल्हापूर रेल्वेस्थानकात चित्राच्या माध्यमातून हा प्रकल्प एक महिन्यापासून राबविला जात आहे.

प्रवासी, पर्यटक तसेच मुले, कुटुंबीय छायाचित्राखालची माहिती वाचून त्यानंतर अधिक माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकतात. याचा शालेय अभ्यासक्रमही आहे. पालक व मुलांना सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधता जपता यावी, हाच यातून संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभाग यांच्यातर्फे सांगण्यात आले. याचबरोबर रेल्वेस्थानकात थुंकणे, कचरा टाकणे असे प्रकार या सुंदर चित्रांच्या निर्मितीमुळे बंद होण्यास मदत होऊन स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ भारत, स्वच्छ रेल्वेस्थानकाची ओळखही यातून पुढे येईल. या प्रायोगिक प्रयोगानंतर भविष्यात आणखी काही रेल्वेस्थानकांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार आहे.

अशा उपक्रमांची गरज : पर्यटक, प्रवाशांचा प्रतिसाद
वयाची साठी उलटलेले व वर्षभरापूर्वी बायपास सर्जिकल झालेल्या चिपळूणचे चित्रकार सिताराम जीवबा घारे यांच्या या अप्रतिम, सुंंदर आकर्षक अशा कलाकृतींना दाद द्यावी तितकी कमीच आहे. गेले आठ महिने त्यांच्या हस्तकलेतून रेखीव, सुबक व लक्षवेधी तसेच हुबेहुब जंगली प्राणी, पशु-पक्षी हे नजरेत भरतील अशी रेखाटलेली ही कलाकृती पाहताना कळत न कळत सर्वांच्याकडून वाहवा मिळवून जात आहे.

असे पशु-पक्षी दिसतात रेल्वेस्थानकात
रेल्वेस्थानकाच्या भिंतीवर टायगर, काळवीट, रानमांजर, हरण, ससा, जंगली कुत्रे, लांडगा, कोल्हा, गवा, अस्वल, मोर, वानर, खवले मांजर, साळींदर, नाग, भारतीय अजगर, टोळ, मणियार, चोशिंगा, चापडा, तस्कर, फुरुस, इंडियन कोब्रा, स्टॅईप्ड टायगर, फुलपाखरू.

शामा, तारवाली, खवेलदार होला, नारंगी डोक्याचा कस्तूर, खवेलदार होला, पांढºया पोटाची मनोली, टीपकेवाला पहाडी सानभाई, व्हाईट आॅरेंज टीप, ब्लू पँझी, क्रिम्सन टिप, ग्रास ज्वेल तसेच विविध प्रकारचे कीटक पाहायला मिळतात.

यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात
यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात
अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व) विभागाचे सुनील लिमये, के. पी. सिंह (अपर प्रधान वनसंरक्षक नियोजन व व्यवस्थापन (वन्यजीवन) नागपूर, एम. के. राव अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव पश्चिम) मुंबई, डॉ. व्ही. क्लेमेंट बेन मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले.
विशेष अनुदानाची तरतूद पुणे येथील सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश कुमार त्यागी यांनी केली. इको टुरिझम बोर्डचे सदस्य अनुज खरे, चिपळूणचे निसर्ग सेवा संस्थेचे नीलेश बापट, ओंकार बापट यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला. यावर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका बैठकीत मान्यता दिली. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी कृष्णात पाटील, स्टेशन मास्तर आय फर्नांडिस यांनीही रेल्वेची जागा देऊन महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांच्यातर्फे निसर्गाची जपणूक, तेथील प्राणी जीवनाविषयी जनजागृती तसेच त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणूनच अशा चित्रांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात यश येत असून, मानवाला निसर्ग, प्राणी, पक्षी यांच्याशी जोडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

-  डॉ. विनीता व्यास उपसंचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराड 


Web Title: In the forest, there are tigers, herb, clusters, fox, Kolhapur, Satara, Karhad and Miraj railway stations.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.