शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 26, 2024 04:00 PM2024-02-26T16:00:58+5:302024-02-26T16:03:22+5:30

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन

File cases against those responsible for the death of farmers in the Delhi movement, Samajwadi Party protest in Kolhapur | शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

छाया : नसीर अत्तार

कोल्हापूर : शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भारतरत्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये २३ पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी करा, शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतकऱ्यांना ५८ वर्षानंतर पेन्शन सुरु करा, शेतजमिनींचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करा, धान्याच्या आयात शुल्कात वाढ करा, नुकसानीचे मुल्यांकन शेतकरीनिहाय करावे, भारतीने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे, पंतप्रधान विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे पैसे शासनाने भरावे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पिडितांना न्याय द्यावा, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ फळे, भाजीपाला यांची आयात कमी करा, वीज बिले माफ करुन मोफत २४ तास वीज द्या या मागण्या मान्य कराव्यात. 

सध्या देशात दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करतात. दुर्देवाने यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला. यावेळी रवी जाधव, मुकुंद माळी, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, बाबू कदम, ए. एन. पाटील, सुभाष देसाई, रसूल नवाब, जावेद मोमीन, रफिक इस्माईल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: File cases against those responsible for the death of farmers in the Delhi movement, Samajwadi Party protest in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.